लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : मुंबईला तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसल्यानंतर झालेल्या निसर्गबदलामुळे अनेक ठिकाणी अचानक वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह पाऊसधारा बरसल्या. दरवर्षी उन्हाळ्याच्या अखेरीस ‘वळवाचा पाऊस’ येत असतो. यंदा तो थोडा जास्तच आहे. अशा वेळी शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
मान्सूनपूर्व विजांचा कडकडाट, जोराचा वारा असे निसर्गबदल दिसून येत असतात. शिवाय, यंदा मान्सून वेळेवरच दाखल होणार असल्याचा अंदाजसुद्धा हवामान विभागाने वर्तविला आहे. उमरेड परिसरात ८ मे तसेच १८ आणि १९ मे रोजी पाऊस झाला. वातावरणातील बदलामुळे अनेकांनी चिंता व्यक्त केली. दुसरीकडे, शेतकरी खरीप हंगामात ज्या पद्धतीने पूर्वतयारी करतात तसेच नियोजन आखावे, बदलत्या मोसमामुळे घाबरून जाऊ नये, असे मत तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे यांनी व्यक्त केले.