लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनेक दिवसानंतर शनिवारी मध्यरात्रीनंतर १ वाजता सुरू झालेल्या कळमना भाजी बाजारात शेतकऱ्यांचा अर्ध्यापेक्षा जास्त भाजीपाला विक्रीविना परत गेल्याचा आरोप कळमना सब्जी बाजार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना केला. याकरिता कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मनमानी कारणीभूत असल्याचा आरोप त्यांनी केला.असोसिएशनचे अध्यक्ष नंदकिशोर गौर म्हणाले, दुचाकींना मार्केट परिसरात प्रवेश करण्यास मनाई होती. शिवाय किरकोळ विक्रेत्यांच्या ३०० तीनचाकी वाहनांना मार्केटमध्ये प्रवेशाला परवानगी होती. पण समितीच्या कर्मचाऱ्यांनी कळमन्याच्या चिखली गेटवर बॅरिकेट्स लावून केवळ ६० ते ७० तीनचाकी आत सोडल्या. किरकोळ विक्रेत्यांना खरेदीसाठी आत न सोडल्याने शेतकऱ्यांचा माल विक्रीविना पडून राहिला. सकाळी ७ वाजता समितीचे कर्मचारी आणि पोलिसांनी बाजार बंद केला. अखेर शेतकऱ्यांना भाज्या गाड्यांमध्ये भरून खुल्या बाजारात विक्रीसाठी न्याव्या लागल्या. कळमन्यात भाजीपाला विक्रीसाठी आणण्याऐवजी खुल्या बाजारातच विक्री केली असती तर बरे झाले असते, अशा शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया होत्या, असे गौर म्हणाले.कळमना भाजी बाजार सुरू करताना समितीने बाजाराला तीन परिसरात विभागले असून २०५ अडतियांपैकी एका दिवशी ५० अडतियांना व्यवसाय करण्याची परवानगी दिली. खरे पाहता चिखली प्रवेशद्वारापासून भाजी बाजाराचे अंतर अर्धा किमी तर न्यू ग्रेन मार्केटमधील दुसºया बाजाराचे अंतर पाऊण किमी आहे. अनेक किरकोळ विक्रेत्यांना गेटबाहेर गाड्या ठेवून बाजारात पायी जाण्यास सांगितले. त्यामुळे अनेकजण बाजारात गेलेच नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाची विक्री झाली नाही. समितीने एका अडतियाला दोन गाड्यांमधील भाज्या विकण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अनेक गाड्या गेटबाहेरून परत पाठविण्यात आल्या. या सर्व घडामोडींमुळे शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागला. समितीने योग्यरीत्या नियोजन केल्यास शेतकऱ्यांचा पूर्ण माल विकला जाईल आणि त्यांना आर्थिक फटका बसणार नाही, असे गौर म्हणाले. तीन बाजारात विभागल्या गेलेल्या बाजारापैकी न्यू ग्रेन मार्केटमध्ये पाच अडतियांनी विक्रीसाठी बोलविलेल्या भाज्या विकल्याच नाही. ग्राहक या भागात फिरकलेच नाही. कळमना भाजी बाजाराची वेळ रात्री १ ते सकाळी ७ ऐवजी ९ वाजेपर्यंत वाढवावी, असे गौर म्हणाले.
कळमन्यात शेतकऱ्यांचा माल विक्रीविना परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 12:45 AM
अनेक दिवसानंतर शनिवारी मध्यरात्रीनंतर १ वाजता सुरू झालेल्या कळमना भाजी बाजारात शेतकऱ्यांचा अर्ध्यापेक्षा जास्त भाजीपाला विक्रीविना परत गेल्याचा आरोप कळमना सब्जी बाजार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना केला.
ठळक मुद्देसमितीच्या मनमानीचा असोसिएशनचा आरोप : वेळेची मर्यादा, गाड्या आत सोडल्या नाहीत