नागपूर : शेतकऱ्यांनी परंपरागत शेतीला तंत्रज्ञानाची जाेड देऊन प्रयाेगशील शेतीकडे वळण्याची आवश्यकता आहे, मात्र शेतकऱ्यांना उत्पादनाचा याेग्य लाभ मिळवून देण्याची जबाबदारी सरकारची आहे. या कृषी उत्पादनाचे पॅकेजिंग, मार्केटिंग आणि ब्रॅन्डिंग करण्यासाठी गुंतवणूकदारांनी समाेर येणे गरजेचे आहे. अशाप्रकारे शेतकरी, सरकार आणि गुंतवणूकदार एकत्र आले तर शेतीला समृद्ध करणे शक्य आहे, असे मत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चाैहान यांनी ॲग्राेव्हीजन कृषिप्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले.
केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतील ॲग्राेव्हिजनच्या राष्ट्रीय कृषिप्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी अमरावती राेडवरील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या (पीडीकेव्ही) दाभा मैदानावर झाले. याप्रसंगी खासदार कृपाल तुमाने, खा. रामदास तडस, आमदार समीर मेघे, जिल्हाधिकारी विपीन इटणकर, इंडियन ऑइलचे कार्यकारी संचालक शांतनू गुप्ता, पीडीकेव्हीचे कुलगुरू डाॅ. शरद गडाख, पशू व मत्स्य शिक्षण विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. आशिष पातूरकर, स्टेट बॅंकेचे सीजीएम शांतनू पेंडसे, आमदार प्रवीण दटके, आ. नागाे गाणार, माजी आमदार अनिल साेले, गिरीश गांधी, डाॅ. सी. डी. मायी आदी मान्यवर उपस्थित हाेते.
मुख्यमंत्री चाैहान यांनी यावेळी कृषी विकासाची पंचसूत्री सांगितली. शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविणे, शेतीचा खर्च कमी करणे, उत्पादनाला याेग्य भाव देणे, नैसर्गिक आपत्तीने झालेल्या नुकसानाची याेग्य भरपाई देणे आणि तंत्रज्ञानाद्वारे आधुनिक शेतीसाठी प्राेत्साहन देणे आवश्यक आहे. मध्य प्रदेशात सिंचनाच्या साेयी करून या पंचसूत्रीने कृषी विकास घडवून आणल्याचे त्यांनी सांगितले. ४५ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आली. गव्हाच्या उत्पादनात राज्य पंजाब, हरयाणाच्याही पुढे गेले. औषधी शेतीसह फळ, फूल, भाज्यांच्या उत्पादनात सातत्याने वाढ हाेत आहे. १० वर्षांपासून कृषी विकास दर १८ टक्क्यांवर असल्याचे त्यांनी सांगितले. चाैहान यांनी नितीन गडकरींच्या कार्याचे काैतुक केले. त्यांच्या सूचनेनुसार राज्यात साैरपंपचा वापर व इथेनाॅलचे उत्पादन सुरू केल्याचे सांगत ॲग्राेव्हीजनसारखे कृषिप्रदर्शन मध्य प्रदेशातही घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
प्रास्ताविक ॲग्राेव्हीजनचे आयाेजन सचिव रवि बाेरटकर यांनी केले. रमेश मानकर यांनी आभार मानले.
अन्नदात्या शेतकऱ्याने आता ऊर्जादाता बनावे : गडकरी
नितीन गडकरी यांनी दरवर्षी आपल्या देशात १६ लाख काेटी रुपयांचे इंधन आयात केले जात असल्याचे सांगत, कृषी क्षेत्रातून हा खर्च राेखणे शक्य असल्याचे ते म्हणाले. पूर्वी प्रदूषणाचे कारण ठरलेल्या परळीपासून इथेनाॅल व बिटुमिन तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. विदर्भातील भात उत्पादक जिल्ह्यात वेस्ट मटेरियलपासून सीएनजी तयार हाेत आहे. शिवाय पाण्यातून हायड्राेजन वेगळे करून ग्रीन हायड्राेजन इंधन तयार करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. हे सर्व भविष्यात पेट्राेल, डिझेलचे पर्याय ठरणार आहेत. शेतकऱ्यांनी बाॅयाे इंधननिर्मितीत पुढाकार घ्यावा. त्यांनी अन्नदात्यापासून ऊर्जादाता बनण्याची वेळ आली आहे, असे आवाहनही त्यांनी केले.