काटोल : राज्य सरकारने २०१७ मध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली होती. परंतु ती कर्जमाफी सरसकट नसल्याने त्यावेळी फक्त ६० ते ६५ टक्के शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा फायदा झाला. नागपूर जिल्ह्यातील ९,५६६ तर काटोल व नरखेड तालुक्यातील ३,५१८ शेतकरी त्या कर्जमाफीपासून वंचित आहेत. आता सात वर्षानंतर बँकांनी शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतित आहेत. २०१७ मध्ये तत्कालीन सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली होती. त्यामध्ये ३० जून २०१३ पर्यंत शेतकऱ्याकडे असलेल्या कर्जापैकी दीड लाखाच्या कर्जमाफीची घोषणा केली होती. परंतु त्याकरिता महाराष्ट्र शासनाच्या कर्जमाफी पोर्टलवर जाऊन शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करावे लागतील, असे स्पष्ट केले होते. त्याप्रमाणे शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज केले. आधारकार्डप्रमाणे अंगठा (थम्ब इम्प्रेशन) लावून दिले. संबंधित बँकांनी थकीत कर्जमाफीचे प्रस्ताव शासनाकडे पाठविले होते. त्याप्रमाणे ६० ते ६५ टक्के शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली. परंतु आजही त्या कर्जमाफी योजनेतील काही शेतकरी कर्जमाफी योजनेपासून वंचित आहेत. एकट्या नागपूर जिल्ह्यात ९,५६६ तर काटोल व नरखेड तालूक्यातील ३,५१९ शेतकऱ्यांचा यात समावेश असल्याची माहिती आहे. शेतकऱ्यांनी पोर्टलवर अर्ज केल्यानंतर कर्जमाफीची प्रक्रिया २०१८ पर्यत सुरू होती. त्या काळात शासनाकडून शेतकऱ्यांना कर्जमाफी झालेल्या प्रकरणातील याद्या बँकेत लावल्या गेल्या. ज्या शेतकऱ्यांची नावे यादीत नव्हती ते शेतकरी पुढील यादीत नाव येईल, या आशेवर होते. आता शेतकऱ्यांना बँकांकडून वसुलीच्या नोटीस येत आहेत. या नोटीसमध्ये संबंधित शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आले होते. मात्र प्रस्ताव नाकारण्यात आल्याने कर्जाचा भरणा करण्याचे सांगण्यात आले आहे. मात्र जिल्ह्यात ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही त्यांना संबंधित योजनेचा लाभ मिळावा, अशी मागणी काटोल सिटीझन फोरमच्या वतीने जिल्हा आणि तालुका प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
काटोल-नरखेड तालुक्यातील शेतकरी कर्जमाफीपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 4:10 AM