नागपूर : दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला तीन महिने होत आले आहेत. आंदोलनाच्या समर्थनार्थ उत्तर भारतात ठिकठिकाणी महापंचायती आयोजित केल्या जात आहेत. आता २० फेब्रुवारी रोजी विदर्भातही अशी महापंचायती आयोजित करण्यात आली आहे. यवतमाळमध्ये होणाऱ्या या महापंचायतमध्ये संयुक्त किसान मोर्चाचे राकेश टिकैत, युद्धवीर सिंह आदी शेतकरी नेते मार्गदर्शन करतील.
यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्येने सर्वाधिक ग्रस्त जिल्हा असल्याने येथे महापंचायत आयोजित केल्याचे महापंचायतचे समन्वयक श्रीकांत तराळ यांनी म्हटले आहे. मोर्चाचे सदस्य संदीप गिड्डे पाटील यांनी बुधवारी यवतमाळ येथे जवळपास ३० सहकारी संघटनांसोबत बैठक घेऊन महापंचायतीच्या तयारीचा आढावा घेतला. दरम्यान अखिल भारतील किसान संघर्ष समन्वय समितीने गुरुवारी रेल्वे रोको आंदोलनाची घोषणा केली आहे.