टेंभूरडोह शिवारातील घटना : मृतदेह फेकला विहिरीतलोकमत न्यूज नेटवर्कसावनेर/खापा : तरुण शेतकऱ्याचा त्याच्या शेतातील नोकराशी पैशाच्या देवणघेवाणीवरून वाद उद्भवला आणि याच वादातून नोकराने शेतकऱ्याचा खून केला. ही घटना खापा (ता. सावनेर) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टेंभूरडोह शिवारात बुधवारी रात्री घडली असून, गुरुवारी सकाळी उघडकीस आली. निखील दिवाकर जिचकार (३१, रा. टेंभूरडोह, ता. सावनेर) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. यासंदर्भात निखीलच्या भावाने खापा पोलिसांना सांगितले की, निखीलच्या आत्याची टेंभूरडोह फाटा परिसरात शेती असून, ही शेती निखीलने यावर्षी ठेक्याने केली होती. या शेतात घर असल्याने निखील नेहमीच या घरात मुक्काम करायचा. त्याने शेतात काम करण्यासाठी चिंचगाव (मध्य प्रदेश) येथील शिवचरण परतेती याला नोकर म्हणून ठेवले होते. शिवचरणदेखील शेतातच राहात होता. दरम्यान, निखील बुधवारी रात्री शेतातच होता. दरम्यान, रात्री निखील आणि शिवचरण या दोघांमध्ये पैशाच्या देवाणघेवाणीवरून भांडण झाले. त्यातच दोघांमध्ये झालेल्या हाणामारीत शिवचरणने निखीलच्या डोक्यावर दगडाने वार केले. त्यात गंभीर दुखापत झाल्याने निखील घटनास्थळीच गतप्राण झाला. त्यानंतर शिवचरणने निखीलचा मृतदेह शेतातील विहिरीत फेकला आणि निखीलची मोटरसायकल घेऊन घटनास्थळाहून पळून गेला. गुरुवारी सकाळी निखीलचा मृतदेह शेतातील विहिरीत आढळून आला. त्यावेळी शिवचरण व निखीलची मोटरसायकल शेतातून बेपत्ता असल्याचे आढळून आले, असेही निखीलच्या भावाने पोलिसांना सांगितले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले आणि मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी खापा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविला. याप्रकरणी खापा पोलिसांनी निखीलच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा नोंदविला आहे. या घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश भोयर यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार अनामिका मिर्झापुरे करीत आहेत.
पैशाच्या वादातून शेतकऱ्याचा खून
By admin | Published: July 14, 2017 2:39 AM