३० हजारांचा गंडा : व्यापारी आणि दिवाणजीची बनवाबनवीलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या मालाची जादा दरात विक्री करून त्याला ३० हजार रुपये कमी देऊन फसवणूक करणाऱ्या कळमन्यातील व्यापाऱ्यासह दोघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. बंटी वर्मा असे यातील मुख्य आरोपीचे नाव आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील लोणी (ता. पारंडा) येथील सीताराम हिंदूराव पाटील (वय ३९) २ जुलैला सकाळी निंबू घेऊन कळमन्यात आले. त्यांनी आपले वाहन कळमना मार्केटमध्ये ऊभे केल्यानंतर या मालाच्या विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती जवळच्या आरोपी बंटी वर्मासोबत संपर्क साधला. आरोपी वर्माचे कळमना मार्केटमध्ये वेद ट्रेडर्स नावाने दुकान आहे. २ ते ३ जुलै दरम्यान पाटील यांच्या निंबूची विक्री केल्यानंतर वर्माने त्यांना त्यांच्या मालाचे पैसे दिले. मात्र, आपल्या निंबूंना खूपच कमी भाव मिळाल्यामुळे पाटील यांनी त्यांना त्याबाबत विचारणा केली. यावेळी वर्मा आणि त्यांच्याकडील हिशोबाचे काम करणाऱ्याने (दिवाणजी, वय ३५) जेवढ्यात माल विकला तेवढे पैसे दिल्याचे सांगून पाटील यांना वाटेला लावण्याचा प्रयत्न केला. पाटील यांनी निंबू खरेदी करणारांकडे संपर्क केला असता आरोपींनी जादा दराने माल विकून पाटील यांना २९ हजार ५०५ रुपये कमी दिल्याचे स्पष्ट झाले. त्याबाबत पाटील यांनी उजर केला असता आरोपी वर्मा आणि त्याच्या मुनिमने त्यांच्याशी वाद घातला. त्यामुळे पाटील यांनी कळमना ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी चौकशी केली असता वर्मा आणि त्याच्याकडील दिवाणजीने पाटील यांना २९,५०५ रुपयांनी फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलीस उपनिरीक्षक आनलदास यांनी वर्मा व त्याच्या दिवाणजीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
उस्मानाबादच्या शेतकऱ्याची फसवणूक
By admin | Published: July 05, 2017 2:02 AM