लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खरीप हंगामात कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव अधिक दिसून आला असून शेतकऱ्यांनी येणाऱ्या काळात एकात्मिक व्यवस्थापनाद्वारे कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचा नायनाट करून पिकास संरक्षण द्यावे, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक एन.टी शिसोदे यांनी केले आहे.कापूस हे नगदी पीक आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा तसेच खानदेशात कपाशीची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. नागपूर विभागात सन २०१७-१८ च्या खरीप हंगामात एकूण १८ लक्ष २५ हजार ५६७ लागवडी क्षेत्रापैकी ६ लक्ष ६३ हजार ३६४ हेक्टर क्षेत्रात कापसाचे पीक घेण्यात आले होते.सन २००२ पासून बोंडअळ्यांच्या व्यवस्थापनासाठी बी. टी. जनुक वाणांचा वापर करण्यात येत आहे. याद्वारे कापसाचे संकरित बियाणे तयार करून कपाशीला बोंडअळ्यांपासून वाचविण्याचा प्रयत्न केला जात आहे, परंतु मागील वर्षी अळ्यांची बी.टी. जनुकांविरुद्ध प्रतिकार शक्ती वाढल्याने पिकास मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.कपाशीच्या पिकास होणाऱ्या नुकसानीपासून वाचविण्याकरिता शेतकऱ्यांनी कमी कालावधीचे तसेच खात्रीच्या बियाण्याची खरेदी करून लागवड करावी. १५ जून ते ५ जुलै दरम्यान पेरणी करावी. पेरणीचा काळ लांबवू नये. बी.टी. बियाण्यासोबत १२० ग्रॅम गैर बी.टी. बियाण्याचा आश्रय पीक म्हणून वापर करावा. भेंडी पिकाची दोन महिन्याने पेरणी करावी. नैसर्गिक मित्र किडीचे संवर्धन होण्यासाठी मका, चवळी, झेंडू, एरंडी पिकांची एक ओळ लावावी. शेतात हेक्टरी किमान १० पक्षी थांबे उभे करावे. सुरुवातीच्या तीन महिन्यामध्ये रसशोषक किडींना प्रतिकारक वाणांची लागवड करावी. त्यामुळे कीटकनाशकांची गरज भासत नाही.आॅगस्ट महिन्याच्या मध्यापासून कामगंध सापळे, हेक्टरी ५ याप्रमाणे लावावे, अडकलेले पतंग वेळोवेळी नष्ट करावे, सापळ्यातील ल्युर्स १५ ते २० दिवसांनी बदलावे, ट्रायकोग्रामा बॅक्ट्री कीटकाचा प्रती हेक्टर १.५ लक्ष प्रमाणे आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये शेतात प्रसार करावा. अळीचा प्रादूर्भाव दिसून येताच पाच टक्के निंबोळी फवारणी करावी. पहिल्या तीन महिन्यात जैविक कीटकनाशकाचा तसेच विविध एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा वापर करावा. कामगंध सापळ्याद्वारे १० टक्केपर्यंत पिकास नुकसान दिसून आल्यास आर्थिक नुकसानीची संकेत पातळी ओळखून रसायनाचा वापर करावा. कीटकनाशकाचा वापर शेवटचा पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी करणे चांगले.बोंडअळ्या प्रामुख्याने पेरणीनंतर ५० ते ६० दिवसांनी पिकांवर हल्ला करून कापसाची सरकी तसेच रुईला नुकसान पोहोचवितात. हिरव्या बोंडावरती डाग, कामगंध सापळ्यामध्ये नर पतंग अडकल्यास, अर्धवट उमललेली डोमकळी तसेच हिरव्या बोंडावर असणारे निकास छिद्र याद्वारे कपाशीच्या पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाली असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होत असल्याचे विभागीय कृषी सहसंचालक एन. टी. शिसोदे यांनी सांगितले आहेबियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके खरेदी करताना जागरूक राहावेशेतकऱ्यांनी अधिकृत निविष्ठा विक्री केंद्रातून बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके यांची खरेदी करताना जागरूक राहावे, असे कृषी सहसंचालक एन. टी. शिसोदे यांनी म्हटले आहे.शेतकऱ्यांनी बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके यांची खरेदी करताना बिल घेणे आवश्यक आहे. या बिलावर दर, किंमत, लॉट व बॅच क्रमांक, वाणाचे नाव, उत्पादक कंपनीचे नाव, बिलाची तारीख या बाबींची नोंद घ्यावी. तसेच ही बिले शेतकऱ्यांनी जपून ठेवावीत. खरेदी मालाची पाकिटे सीलबंद, मोहरबंद आहेत किंवा नाही यांची खात्री करावी. बियाणे खरेदी करण्याआधी पाकीटावरील अंतिम मुदत पाहणे जरुरीचे आहे.खरेदी केलेल्या बियाण्यांची पिशवी, पाकीट, लेबल, टॅग आणि त्यातील थोडे बियाणे जपून ठेवावे. घरचे बियाणे वापरताना त्याची उगवण क्षमता तपासावी. कमी वजनाच्या निविष्ठा तसेच कोणत्याही ठिकाणी ज्यादा दराने आकारणी होत असलेले, बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके यांचा दर्जा, भेसळ तसेच उगवणीसंबंधी तक्रारी असल्यास उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या तक्रार निवारण समितीकडे शेतकरी तक्रार करू शकतात तसेच पंचायत समिती व तालुका कृषी अधिकारी यांच्या टोल फ्री क्रमांक १८००२३३४००० वर संपर्क साधू शकतात. याशिवाय कापूस बियाणे व पिकांच्या संबंधात सर्व तक्रारीचे निवारण करण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी किंवा कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद यांचेकडे लेखी तक्रार नोंदविता येईल.
शेतकऱ्यांनो कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचा नायनाट करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 12:31 AM
खरीप हंगामात कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव अधिक दिसून आला असून शेतकऱ्यांनी येणाऱ्या काळात एकात्मिक व्यवस्थापनाद्वारे कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचा नायनाट करून पिकास संरक्षण द्यावे, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक एन.टी शिसोदे यांनी केले आहे.
ठळक मुद्देएन.टी. शिसोदे : विभागीय कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना आवाहन