लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेती करताना शेतकऱ्यांनी आंतरपीक घेण्याची गरज असून कुक्कुटपालन, फळ उत्पादन तसेच डेअरी यासारखे उद्योग करून सामूहिक शेतीला प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन भारतीय कृषी अनुसंधान संस्था नवी दिल्लीचे माजी संचालक डॉ. शरणागौडा पाटील यांनी केले.भारतीय कृषी अनुसंधान परिषद केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या वतीने महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आयोजित ‘कापूस मेळावा २०१९’ मध्ये ते अध्यक्षस्थानाहून बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे माजी कुलगुरु डॉ. शरद निंबाळकर, कृषी विभागाचे सह संचालक रविंद्र भोसले, कापुस विकास संचालनालयाचे संचालक डॉ. आर. पी. सिंह, केंद्रीय कापुस संशोधन संस्थेचे माजी संचालक डॉ. एम. एस. कैरो उपस्थित होते. डॉ. शरणागौडा पाटील यांनी भविष्यात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवणार असून त्यापूर्वीच पाण्याचे नियोजन करणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. डॉ. आर. पी. सिंह यांनी जैविक शेतीचे महत्व सांगून सरकारच्या कृषी योजनांची माहिती दिली. रविंद्र भोसले यांनी गटशेतीचे फायदे सांगितले. डॉ. एम. एस. कैरो यांनी खेड्यात शेती विषयक लघु उद्योगाचा विस्तार होण्याची गरज असल्याचे सांगितले. डॉ. शरद निंबाळकर यांनी बी. टी. बियाण्याचा वापर लागवडीसाठी करण्याचे आवाहन केले. मेळाव्यात संस्थेने प्रकाशित केलेल्या माहितीपत्रक, स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी कापूस उत्पादनांचे तंत्रज्ञान, गुलाबी बोंड अळीचे व्यवस्थापन, किडनाशकांचा सुरक्षित वापर, कपाशीवरील रोगांचे व्यवस्थापन आदी विषयांवर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविकातून केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. विजय वाघमारे यांनी केंद्रीय कापुस संशोधन केंद्राने विकसीत केलेले तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे हे मेळाव्याचे उद्दिष्ट असल्याचे मत व्यक्त केले. आभार डॉ. एस. एम. वासनिक यांनी मानले.
शेतकऱ्यांनी सामुहिक शेतीला प्राधान्य द्यावे : शरणागौडा पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 12:39 AM
शेती करताना शेतकऱ्यांनी आंतरपीक घेण्याची गरज असून कुक्कुटपालन, फळ उत्पादन तसेच डेअरी यासारखे उद्योग करून सामूहिक शेतीला प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन भारतीय कृषी अनुसंधान संस्था नवी दिल्लीचे माजी संचालक डॉ. शरणागौडा पाटील यांनी केले.
ठळक मुद्देकेंद्रीय कापूस संशोधन संस्थेतर्फे कापूस मेळावा २०१९