अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण गाव पातळीवर गटांना मार्गदर्शन
नागपूर : पिकावर पडणाऱ्या वेगवेगळ्या किडींच्या नियंत्रणासाठी प्रभावी व सहज शक्य असणारा ट्रायकोकार्ड निर्मिती उपक्रम शेतकऱ्यांनी राबवावा, या प्रयोगातून उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गुरुवारी या संदर्भात एका प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कृषी विभाग, आत्मा, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, व्हीएसटीएफ व जिल्हा यंत्रणेतील अन्य विभागाचे अधिकारी कर्मचारी समाविष्ट होते. अधिकारी कर्मचारी आजचे प्रशिक्षण घेऊन ग्रामपातळीवरील शेतकरी गटांना यासंदर्भात प्रशिक्षित करणार आहे. कीडनियंत्रणासाठी प्रभावी ठरलेल्या ट्रायकोकार्ड निर्मिती उपक्रम यावर्षी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी राबवावा, यासाठीचे नियोजन जिल्हा प्रशासन करीत आहे.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कमलकिशोर फुटाणे, प्रकल्प संचालक आत्मा डॉ. नलिनी भोयर, रिजनल सेंटर इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट सेंटर नागपूरचे उपसंचालक डॉ. ए. के. बोहरिया, तांत्रिक अधिकारी प्रल्हाद कोल्हे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विकास इलमे, कृषी विकास अधिकारी वंदना भेले, कृषी उपसंचालक अरविंद उपरीकर, आदींसह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.