कामठी : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी राज्य शासनाच्या ई-पीक पाहणी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन कामठीचे तहसीलदार अरविंद हिंगे यांनी केले. भिलगाव येथे ई-पीक पाहणी योजनेंतर्गत आयोजित कार्यक्रमात हिंगे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. राज्य शासनाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी नवीन ई-पीक पाहणी अॅप तयार केला आहे. याअंतर्गत स्मार्ट मोबाईलमध्ये शेतकऱ्यांनी अॅप स्थापित करून त्याची योग्य माहिती भरली तर शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात पेरणी केलेल्या विविध पिकाची माहिती पारदर्शक पद्धतीने ७/१२ मध्ये नोंदणी होते. याचा शेतकऱ्यांना पीक विमा योजनेसाठी उपयोग होतो.
एखाद्या नैसर्गिक आपत्ती नुकसानीचे फोटो टाकल्यामुळे नुकसानभरपाई मिळण्यासाठी या अॅपचा उपयोग होणार आहे. माहिती वेळेवर आणि अद्यावत झाल्याने रासायनिक खते, कीटकनाशके उपलब्धता आणि विविध पिकांच्या उत्पादनाच्या विक्रीसाठी नियोजनासह विविध विषयाची माहिती मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना याचा उपयोग करता येणार आहे. या प्रकल्पासाठी नागपूर विभागातून कामठी तालुक्याची प्रायोगिक तत्त्वावर निवड करण्यात आली आहे. तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन हिंगे यांनी केले. सध्या तालुक्यात २,४९२ शेतकऱ्यांनी पीक योजनेची नोंदणी केली आहे. भिलगाव येथे मंडळ अधिकारी महेश कुलदीप पवार, संजय कांबळे, संजय अनवाणे, पटवारी राहुल भुजाडे, नितीन उमरेडकर, ज्योती शिरभाते, शुद्धोधन काळपांडे व शेतकरी उपस्थित होते.