लाेकमत न्यूज नेटवर्क
रेवराल : महसूल व कृषी विभागाच्या सहकार्याने जमाबंदी आयुक्त पुणे यांनी खासगी कंपनीच्या मदतीने ई-पीक ॲप विकसित केले आहे. पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्याची प्रक्रिया सुकर व्हावी म्हणून प्रत्येक शेतकऱ्याने या ई-पीक ॲपचा वावर करून त्यावर आपल्या शेतातील पिकांची नाेंदणी करावी, असे आवाहन तहसीलदार मल्लिक विरानी यांनी खंडाळा-पिपरी (ता. माैदा) ग्रामपंचायत सभागृहात आयाेजित केलेल्या शेतकरी कार्यशाळेत केले.
विविध नैसर्गिक संकटांमुळे पिकांचे नुकसान हाेते. शेतकऱ्यांना या नुकसानीची भरपाई देण्यासाठी नुकसानग्रस्त पिकांचे सर्वेक्षण करावे लागते. ओला व काेरडा दुष्काळ, अतिवृष्टी व वादळामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचा अचूक अंदाज व्यक्त करता यावा, त्यातून शेतकऱ्यांना याेग्य नुकसानभरपाई मिळवून देता यावी, यासाठी ई-पीक ॲप विकसित केले आहे. हे ॲप मराठीत असून, हाताळायला साेपे आहे. शेतकऱ्यांनी या ॲपवर नाेंदविलेल्या माहितीची तलाठी खातरजमा करतील. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला त्यांच्या शेतातील पीकपेरा या ॲपवर नाेंदवायचा आहे, असेही तहसीलदार मल्लिक विरानी यांनी सांगितले.
या कार्यशाळेला मंडल अधिकारी अनिल भगत, पिपरीचे उपसरपंच चक्रधर गभणे, तलाठी तुषार इडपाते, ग्रामपंचायत सदस्य चंद्रभान किरपान, विनोद कांबळे, ग्रामसेवक रवींद्र खिराडे, सचिन किरपान, दिनेश डोरले यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
140821\img-20210813-wa0014.jpg
शेतकऱ्यांनो ई पिकच वापर करा......