कळमेश्वर : कळमेश्वर तालुक्यात गत हंगामातील सोयाबीन पीक काढणीच्यावेळी पाऊस पडल्याने काही प्रमाणात बियाणे भिजले. त्यामुळे बियाणांच्या उगवण क्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकऱ्यांनी आधी बियाणांची घरच्या घरी उगवण क्षमता तपासणी करून घ्यावी. बियाणांची उगवण क्षमता येईल त्या प्रमाणात पेरणीसाठी बियाणांचा प्रतिहेक्टर वापर करावा, तसेच ६० टक्केपेक्षा कमी उगवणीचे बियाणे वापरू नयेत, असे आवाहन पंचायत समितीचे कृषी अधिकारी तथा गुण नियंत्रण निरीक्षक दीपक जंगले यांनी केले. सोयाबीन हे स्वयंपराग सिंचित व सरळ वाणाचे पीक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी दरवर्षी बियाणे बदलण्याची आवश्यकता नाही. शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे असलेले सोयाबीन बियाणे बाजारात न विकता येत्या खरीप हंगामासाठी राखून ठेवावे. स्वत:ची गरज भागून बियाणे शिल्लक राहत असेल तर शिल्लक बियाणे आपल्या मित्रमंडळी, नातेवाईकांना दिल्यास, घेणार व देणार या दोन्ही शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा होईल. शेतकऱ्यांनी वाळलेल्या बियाणांतील शेंगा, टरफल, काडीकचरा, माती, खडे काढून स्वच्छ करावे. बियाणे पोत्यात भरून ठेवावे. बियाणे साठविताना पोत्यांची थप्पी सात फुटापेक्षा जास्त नसावी. जास्त थप्पी असल्यास खालच्या पोत्यातील बियाणांवर वजन पडल्यामुळे बियाणांची उगवण क्षमता कमी होते. पोत्याची रचना उभ्या-आडव्या पद्धतीने करावी म्हणजे हवा खेळती राहून बियाणांची गुणवत्ता व उगवण क्षमता टिकण्यास मदत होते, असेही दीपक जंगले यांनी सांगितले.
उगवण क्षमता पाहण्याची सोपी पद्धत
सुती पोते किंवा चौकोनी कपडा किंवा वर्तमानपत्राचा पेपर (एकावर एक ५ वर्तमानपत्रे) वरीलपैकी कोणतीही एक वस्तू घेतल्यास ती पूर्णपणे भिजवून घ्यावी. त्यानंतर ती व्यवस्थितपणे जमिनीवर अंथरून ठेवावी. प्रत्येक ओळीमध्ये १०-१० बियांचा वापर करून १०-१० च्या रांगा करून व्यवस्थितपणे बियाणे ठेवून घ्यावे. यानंतर सदर पोते, वर्तमानपत्र, सुती कापड गोलाकार गुंडाळून घ्यावे. गुंडाळताना ओल्या पोत्यातील बिया हलणार नाहीत याची दक्षता नक्की घ्यावी. गुंडाळलेल्या पोत्यास कडेला सुतळीने बांधून घ्यावे आणि तीन ते चार दिवस जेथे जास्त उजेड येणार नाही, अशा ठिकाणी ठेवून त्यावर दिवसातून ३-४ वेळा हलकेसे पाणी शिंपडावे. तीन ते चार दिवस झाल्यानंतर उगवण झालेली एक एक रांग मोजून घ्यावी. १०० पैकी किती बियाणास मोड आलेले आहेत, असे मोजून घ्यावे.
बियाणे पेरण्यास योग्य आहे की नाही कसे ओळखावे?
१०० बियांपैकी किमान ७० बियाणे मोड आलेली असल्यास सदरील बियाणे पेरणीसाठी योग्य आहे असे समजावे. किमान ७० टक्के किंवा त्याच्या पुढे बियाणे उगवण क्षमता असेल, तर सरासरी ३० किलो बियाणे एकरी वापरावे. यानंतर ७० टक्क्यापेक्षा जर उगवण कमी झाली असेल, तर प्रत्येक एक टक्का उगवण क्षमता घटसाठी अर्धा किलो जास्तीचे बियाणे वापरावे. समजा ६९ टक्के उगवण झाली, तर ३०.५ किलो बियाणे वापरावे.