नागपूर : गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाला १९८३ मध्ये मंजुरी मिळाली व १९८८ मध्ये भूमिपूजन झाले. आज गोसेखुर्द प्रकल्पाचा ३४ वर्षाचा काळ लोटला आहे. ३७२ कोटींचा प्रकल्प आजच्या घडीला २१ हजार कोटींवर गेला आहे. १८ हजार कोटी आतापर्यंत खर्च झाले आहेत. या ३४ वर्षात धरण बनले, पाणी जमा झाले. पण शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहचू शकले नाही. येथील प्रकल्पग्रस्तांचे दु:ख अजूनही निवारले नाही. पण या प्रकल्पाने सत्ताधारी, अधिकारी आणि कंत्राटदारांना मालामाल बनविले.
जनमंचच्या वतीने गोसेखुर्द प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी सिंचन शोध यात्रा आयोजित करण्यात आली होती. यात सहभागी झालेल्या तज्ज्ञांनी गोसेखुर्द प्रकल्पाच्या कामाच्या गतीवरून नाराजी व्यक्त केली. या सिंचन शोध यात्रेदरम्यान उजव्या कालव्याला भेट दिली. उजव्या कालव्यातून ९९ किलोमीटर पाणी सोडायचे होते. उजव्या कालव्याचे अनेक ठिकाणी अस्तरीकरण झालेले नाही. सप्टेंबर २०१० मध्ये कालव्याची भिंत वाहून गेली होती. तेव्हापासून कालव्याच्या रिटर्निंग वॉल बांधण्यात आल्या नाहीत. शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहचविण्यासाठी वितरिका बांधण्यात आल्या नाहीत. उजवा कालवा हा मुख्य कालवा असून, १.५ लाख हेक्टर जमीन त्यामुळे सिंचनाखाली येणार होती. पण कालव्याचे काम अपूर्ण आहे.
- कंत्राटदाराने काम सोडले तरी ७ कोटीचे पेमेंट दिले
उजव्या कालव्यावर ४ गेट होते. ते काम १५ कोटी ३० लाख रुपयांचे होते. २०१४ मध्ये कामाचे टेंडर निघाले. कंत्राटदाराला ३ वेळा मुदतवाढ दिली. पण कंत्राटदाराने काम सोडले. त्याने सोडलेल्या अर्धवट कामाचे ७ कोटी रुपये पेमेंट झाले आहे. कंत्राटदारावर १० टक्के पेनॉल्टी लावण्याचा अधिकार असताना केवळ १ हजार रुपये प्रतिदिवस पेनॉल्टी वसूल केली जात आहे. कंत्राटदारावर मेहेरबानी का दाखविली जात आहे, असा सवाल जनमंचच्या सदस्यांनी केला.
- घोडाझरी शाखा कालव्याला रेल्वेचा अडसर
घोडाझरी शाखा कालवा हा गोसेखुर्द प्रकल्पाचा भाग असून, या कालव्यामुळे ५५.५५ किलोमीटरपर्यंतचे सिंचन होणार आहे. या कालव्याची सिंचन क्षमता २८२३५ हेक्टर आहे. ११९ गावात पाणी पोहचणार आहे. या कालव्याचे २०१६ मध्ये काम सुरू झाले. पण रेल्वेमुळे हे काम अजूनही रखडलेले आहे. घोडाझरी शाखा कालव्याचे कार्यकारी अभियंता पृथ्वीराज फाळके यांनी सांगितले की कोरोनामुळे दोन वर्षे काम झाले नाही सोबतच रेल्वे व वनविभागाच्या मंजुरीमुळे हे काम रखडले आहे.
- सिंचन यात्रेत सहभागी तज्ज्ञ
जनमंचचे अध्यक्ष राजीव जगताप यांनी आयोजित केलेल्या या सिंचन यात्रेत सल्लागार शरद पाटील, रमेश बोरकुटे, गोविंदराव भेंडाळकर, प्रा. मिलिंद राऊत, प्रमोद पांडे, प्रमोद रामेकर, दादा झोड, श्रीकांत दौड, प्रदीप निनावे, श्रीकांत देवळे, किशोर गुल्हाने, राम जावळकर, राम आखरे, प्रशांत तारणिक, प्रशांत मोरे आदी सहभागी झाले होते.