नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष वर्गाचा समारोप २ जून रोजी होणार आहे. रेशीमबाग येथील मैदानावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा दोन वर्षांच्या कालावधीनंतर ९ मे रोजी तृतीय वर्ष वर्गाचे आयोजन झाले. देशभरातील ७३५ स्वयंसेवक शिक्षार्थ्यांसह एकूण ९०० कार्यकर्ते वर्गात उपस्थित आहेत. विशेष म्हणजे प्रशिक्षणार्थी स्वयंसेवकांमध्ये शेतकरी, शिक्षक, अभियंता व डॉक्टर यांचादेखील समावेश आहे.
देशभरातील विविध प्रांतांतून आलेल्या ७३५ शिक्षार्थी हे विविध व्यवसाय किंवा क्षेत्राशी जुळलेले आहेत. १६३ शिक्षार्थी हे प्रचारक - विस्तारक आहेत. ५७ शिक्षार्थी हे विद्यार्थी आहेत. याशिवाय नोकरदार (१०८), शिक्षक (१०३), शेतकरी (४७), लघु व्यावसायिक (४५), वकील (३१), अभियंता (२५), कामगार (२३), प्राध्यापक (१७), लघु उद्योजक (१४), वैद्यकीय तज्ज्ञ (५) यांचादेखील प्रामुख्याने समावेश आहे. संघ प्रशिक्षणार्थ्यांना शारीरिक, बौद्धिक, सेवा यांच्यासह विविध विषयांबाबत प्रशिक्षण देण्यात आले.
देशभरातून अतिथी उपस्थित राहणार
यावेळी भाग्यनगर येथील श्रीरामचंद्र मिशनचे अध्यक्ष दाजी उपाख्य कमलेशजी पटेल हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहतील. याप्रसंगी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचेदेखील उद्बोधन होईल. या कार्यक्रमाला देशातील विविध क्षेत्रातील मान्यवर अतिथींचीदेखील उपस्थित राहणार आहे. याप्रसंगी शिक्षार्थी विविध कवायती, योगासने सादर करतील, अशी माहिती वर्गाचे सर्वाधिकारी अशोक पांडे व महानगर संघचालक राजेश लोया यांनी दिली आहे.
कोण आहेत कमलेश पटेल
तरुणांसाठी प्रकाशाचा किरण अशी दाजी उपाख्य कमलेश पटेल यांची ओळख आहे. तब्बल १३७ देशांत त्यांच्या मार्गदर्शनात श्री रामचंद्र मिशनचे कार्य चालते. कमलेशजी पटेल यांचा जन्म १९५६ मध्ये अहमदाबादमध्ये झाला. मिशनच्या जगभरातील वाढीस पाठिंबा देण्याबरोबरच अनेक जबाबदार भूमिका पार पाडल्या. २० डिसेंबर २०१४ रोजी चारीजींचे निधन झाल्यानंतर, ते सहज मार्ग प्रणालीचे आध्यात्मिक मार्गदर्शक आणि श्री रामचंद्र मिशनचे तिसरे अध्यक्ष झाले. आधुनिक काळातील आध्यात्मिक गुरु म्हणून ते जगभरात सर्वत्र आध्यात्मिक साधकांना मार्गदर्शन करतात. विशेषत: तरुणांना आध्यात्मिक मार्गदर्शन करण्यावर त्यांचा भर असतो.