लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : हक्काच्या शेतीचा सातबारा मिळविण्यासाठी एक शेतकरी गेल्या १७ वर्षापासून प्रशासनाचे उंबरठे झिजवितो आहे. परंतु प्रशासकीय पेचात त्याचा सातबारा कुठे अडकलाय, याबाबत कुणीही त्याचे समाधान करू शकले नाही. हक्काच्या शेतीसाठी उंबरठे झिजविताना तो हतबल झाला आहे. त्याच्यावर झालेल्या कर्जामुळे ते फेडण्यासाठी स्वत:चे अवयव विकण्याचा निर्णय त्याने घेतला आहे.या पीडित शेतकऱ्याचे नाव सागर मंदरे आहे. उमरेड तालुक्यातील मकरधोकडा येथील रहिवासी आहे. त्याची वडिलोपार्जित ७ एकर जमीन होती. आर्थिक परिस्थिती बरी नसल्यामुळे वडिलांनी सन १९८९ साली ८५ आर, १९९४ साली ९७ आर आणि १९९५ साली ८१ आर जमीन विकली. शेवटी त्यांच्या जवळ २० आर जमीन शिल्लक राहिली. सागर मंदरे १९९६ पासून त्यांच्याकडे शिल्लक जमिनीच्या सातबाराची मागणी प्रशासनाकडे करतो आहे. आपल्या जमिनीचा सातबारा मिळवण्यासाठी तो १७ वर्षापासून प्रशासनाचे उंबरठे झिवजत आहे. गावातील पटवाऱ्याकडे त्याने सातबारा मागितला असता देण्यास नकार दिला. म्हणून त्याने उमरेडचे उपविभागीय अधिकारी यांच्याकडे दाद मागितली. तेव्हा त्यांनी ताबा वहीवर नोंद नसल्याचे सांगून रिकाम्या हाताने परतवून लावले. त्यानंतर त्याने अप्पर आयुक्तांकडे दाद मागितली. त्यांनीही उपविभागीय अधिकाऱ्याचा आदेश कायम ठेवला. त्यानंतर त्यांनी मुंबई येथे मंत्रालयात जाऊन महसूल विभागात आपली व्यथा सांगितली. महसूल विभागाने नागपूर जिल्हाधिकाऱ्यांना योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले. परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी प्रकरणाची शहनिशा न करता पुनर्मोजणीमध्ये जमीन गेल्याचा अहवाल देऊन महसूल विभागाचा आदेश फेटाळल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे. ते परत जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशाविरुद्ध अप्पर आयुक्तालयात गेले. परंतु त्यांनीही जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश कायम ठेवला. प्रशासनाने न्यायच नाकारल्याने सागर मंदरे हतबल झाले आहे. घरी दोन मुले, वृद्ध वडील असा प्रपंच आहे. प्रशासनाच्या निर्णयाने आता जमीन मिळणार नाही, त्यामुळे तो हतबल झाला आहे. झालेले कर्ज फेडता येईल, या भावनेतून शरीराच्या अवयवाची विक्री करण्याचा निर्णय त्याने घेतला आहे.
अर्ध्या एकरच्या सातबारासाठी शेतकऱ्याची फरफट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 9:30 PM
हक्काच्या शेतीचा सातबारा मिळविण्यासाठी एक शेतकरी गेल्या १७ वर्षापासून प्रशासनाचे उंबरठे झिजवितो आहे. परंतु प्रशासकीय पेचात त्याचा सातबारा कुठे अडकलाय, याबाबत कुणीही त्याचे समाधान करू शकले नाही. हक्काच्या शेतीसाठी उंबरठे झिजविताना तो हतबल झाला आहे. त्याच्यावर झालेल्या कर्जामुळे ते फेडण्यासाठी स्वत:चे अवयव विकण्याचा निर्णय त्याने घेतला आहे.
ठळक मुद्देप्रशासनाच्या चकरा मारून हतबल : कर्ज फेडण्यासाठी अवयव विकण्याचा निर्णय