संघाशी जुळलेल्या व्यापाऱ्याने फसवणूक केल्याचा आरोप : थकीत पैसे परत देण्याची मागणीनागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जुळलेल्या एका व्यापाऱ्याने फसवणूक केल्याचा आरोप करत सुमारे ४०० शेतकऱ्यांनी संघ मुख्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. या इशाऱ्यानंतर संघ वर्तुळातदेखील खळबळ माजली आहे. या शेतकऱ्यांची संंबंधित व्यापाऱ्याने सुमारे आठ लाखांनी फसवणूक केली आहे.सुनील टालाटुले नावाचा हा कापूस व्यापारी गेल्या अनेक वर्षांपासून वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करत आहे. परंतु देशात व राज्यात सत्तापरिवर्तन झाल्यानंतर या व्यापाऱ्याने शेतकऱ्यांचे पैसे थकविणे सुरू केले. प्रशासनातील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्याने प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी केला. मात्र त्यानंतर पैसे देण्यासाठी तो टाळाटाळ करू लागला. सुरुवातीला त्याने शेतकऱ्यांना तारखांवर तारखा दिल्या व नंतर फोनदेखील उचलणे बंद केले. यामुळे शेतकऱ्यांनी वर्धा जिल्ह्यातील सेलू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. परंतु त्यावर काहीही कारवाई झाली नाही, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. अगोदरच निसर्गाची अवकृपा होत असताना विकलेल्या मालाचे पैसे मिळालेले नाहीत. परत आणखी कर्ज घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. संघाचा केंद्र व राज्य शासनावर अंकुश आहे. त्यामुळे हक्काचे पैसे २८ फेब्रुवारीपर्यंत परत मिळाले नाही तर नागपुरातील संघ मुख्यालयासमोर आत्मदहन करण्यात येईल, असे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. संबंधित आरोपांसंदर्भात प्रतिक्रियेसाठी सुनील टालाटुले यांच्याशी वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला. (प्रतिनिधी)आश्वासनपूर्तीची प्रतीक्षायासंबंधात आम्ही दिल्लीत जाऊन संघ पदाधिकाऱ्यांशी भेटण्याचा प्रयत्न केला. टालाटुले संघ स्वयंसेवक असल्याचे त्यांनी मान्य केले, परंतु मदत करण्याचे नाकारले. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याशी भेट घेऊन त्यांच्यासमोर परिस्थिती मांडली. त्यांनी पैसे परत मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. हे पैसे प्रशासनाने द्यायला हवे, ही आमची मागणी आहे, असे शेतकऱ्यांनी सांगितले. मोहन भागवत काका असल्याचा दावासुनील टालाटुले याची पोलिसात तक्रार केल्यानंतर त्याने शेतकऱ्यांवर संताप व्यक्त केला होता. सरसंघचालक डॉ.मोहन भागवत माझे काका असून मुख्यमंत्री फडणवीस भाऊ आहेत. माझे कोणी काही बिघडवू शकत नाही, असे शब्द वापरल्याचा दावा पीडित शेतकऱ्यांचे प्रतिनिधी मनोज शिंदे यांनी केला.
संघ मुख्यालयासमोर आत्मदहन करण्याचा शेतकऱ्यांचा इशारा
By admin | Published: February 25, 2016 3:00 AM