रेवराल : शेतकरी निसर्गाच्या दुष्टचक्रात अडकलेला आहे. वातावरणातील बदल. अवकाळी पाऊस, मजुरांची कमतरता, जलसिंचन सुविधांचा अभाव, अपुरा वीजपुरवठा यातच अल्पप्रमाणात मिळणारे पीककर्जामुळे शेतकऱ्यांचे बजेट कोलमडले आहे. अशात दरवर्षी शेतोपयोगी वस्तूची होणारी दरवाढ शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घालत आहे. यंदा खत उत्पादक कंपन्यांनी खतांच्या किमतीत ५० किलोच्या बॅगमागे १७.३४ टक्के दरवाढ केली आहे. यामुळे शेती करावी, असा प्रश्न मौदा तालुक्यातील शेतकऱ्यापुढे पडला आहे. खरिपात तूर, कापूस, मिरची, सोयाबीन, तर रब्बीत गहू, भाजीपाला आदी पिके घेतात. मात्र दिवसेंदिवस शेतीवरील मनुष्यबळ कमी होत आहे. पिकांची लागवड आणि काढणीचा हंगाम सारखाच येतो. त्यामुळे मजुरांची कमतरता निर्माण होते. अशावेळी पिके काढण्यासाठी बाहेरगावावरून मजूर स्वखर्चाने आणावे लागतात. परिणामी शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. दरवर्षी शेतीची अवजारे, बी-बियाणे आणि रासायनिक खतांच्या किमतीत वाढ आहे. डिझेलच्या किमतीत वाढ झाल्याने ट्रॅक्टर खर्च परवडेनासा झाला आहे.
व्यवस्थेच्या दुष्टचक्रात शेतकरी पिळला जात आहे. यावर्षी तुडतुड्यामुळे शेतकऱ्यांचे अतिनुकसान झाले. नदी किनाऱ्यालगत असलेल्या शेतकऱ्यांना पुराचा फटका बसला. विमा कंपन्यांनी हात वर केले. अशात शेतकऱ्यांनी जगायचे कसे?
- इस्तारू गिरेपुंजे, शेतकरी, खात, ता.मौदा