किसान क्रांती व शेतकरी संघटनेचा निर्णयलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्रातील शेतकरी येत्या १ जूनपासून संपावर जाणार आहेत. किसान क्रांती, शेतकरी संघटना, प्रोगे्रेसिव्ह फार्मर्स व शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या विविध संघटनांची संयुक्त बैठक सोमवारी आमदार निवासात पार पडली. या बैठकीत उपरोक्त निर्णय घेण्यात आला असून शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत हा संप सुरूच राहील. शेतकरी संपावर जाणार म्हणजे शेतीचे कामकाज बंद करणार असे नाही, तर शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण करून शेतकऱ्यांनी स्वत:पुरते पिकवा, बाजारात विकू नका, शेतीमध्ये कापूस व इतर कॅश क्रॉप पिकवा. अन्नधान्याचा पेरा कमी करून बाजारात तुटवडा निर्माण करणे असे आवाहन करण्यात येईल. शेतीमालाला उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा एवढा हमी भाव द्या. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करा. शेतकरीविरोधी कायदे रद्द करा समृद्धी मार्गाचा प्रकल्प रद्द करून ती रक्कम शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत डांबरी रस्ते तयार करण्यास वापरावी. फळ-भाज्यांना सुद्धा हमीभाव जाहीर करून तो खरेदी करावा, दुधाचे भाव ५० रुपयेपर्यंत वाढवावे, या मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. संपकाळात शेतकऱ्यांमध्ये सभा, मेळावे, बैठका घेणे, शेतकऱ्यांनी अन्नधान्याची पेरणी करू नये, बाजारात विकू नये, शहराची रसद बंद करावी, यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे. गावात राहून आंदोलन, धरणे, उपोषण आदी करण्यात येईल. शेतकरी संघटनेचे माजी अध्यक्ष राम नेवले यांनी ही बैठक आयोजित केली होती. बैठकीला किसान क्रांतीचे समन्वयक जियाजीराव सूर्यवंशी, शेतकरी संघटनेचे राज्याचे अध्यक्ष अनिल धनवट, विजय काकडे पाटील, डॉ. श्रीनिवस खांडेकर यांनी मार्गदर्शन केले. बैठकीला सरोज काशीकर, अरुण केदार, मदन कांबळे, शीला देशपांडे, अॅड. नंदा पराते दिलीप काळमेघ, सुनंदा तुपकर आदींसह विदर्भातील शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
शेतकरी १ जूनपासून संपावर केवळ स्वत:पुरते पिकवणार :
By admin | Published: May 30, 2017 2:03 AM