नागपूर : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान- अन्नधान्य पिके व गळीत धान्यअंतर्गत रब्बी हंगामामध्ये प्रमाणित बियाणे, पीक प्रात्यक्षिके, सुधारित कृषी अवजारे व सिंचन सुविधा साधने यासाठी महाडीबीटी प्रणालीद्वारे पुन्हा शेतकऱ्यांंना संधी आहे.
विभागीय कृषी संचालकांनी दिलेल्या माहितीनुसार, यासाठी अर्ज मागविण्यात आले असून, पीक प्रात्यक्षिके शेतकरी गटामार्फत राबविली जाणार आहेत. यासाठी संबंधित कृषी साहाय्यकांशी संपर्क साधून १० हेक्टर क्षेत्र असणाऱ्या गटांना नोंदणी करता येणार आहे. यासाठी ३० ऑगस्ट ते १० सप्टेंबरपर्यंत मुदत आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान- अन्नधान्य पिके व गळीतधान्य कार्यक्रम खालील नमूद जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येतो.
पीक प्रात्यक्षिकासाठी एका शेतकऱ्याला एक एकर मर्यादेत बीज अनुदान रूपात उपलब्ध करून दिले जाणार आहे. जैविक खते, सूक्ष्म मूलद्रव्ये, भू-सुधारके व पीकसंरक्षण औषधे या निविष्ठांसाठी शेतकऱ्याला एक एकरच्या मर्यादेत एका पिकासाठी संबंधित पिकाच्या प्रकारानुसार दोन ते चार हजार प्रतिएकर मर्यादेत डीबीटी तत्त्वावर अनुदान मिळणार आहे. यात शेतकऱ्यांची निवड ऑनलाईन लॉटरी पद्धतीने होणार आहे.