लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पाच किंवा त्यापेक्षा अधिक दुधाळू जनावरे असलेल्या शेतकऱ्यांना प्रथमच ५० टक्के अनुदानावर मिल्किंग मशीन अर्थात दूध काढण्याचे संयंत्र व जनावरांच्या गोठ्यात जमिनीवर अंथरायची रबर मॅट देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या कृषी समितीच्या बैठकीत घेण्यात आला़
दोन्ही योजनांवर ६५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. २०२१-२२ या वर्षासाठी ही योजना लवकरच लागू करण्यात येईल़ यामागे शेतकऱ्यांनी दुग्ध उत्पादनाकडे अधिक संख्येने वळणे तसेच त्यांच्या जनावरांची पावसाळ्यात इतर कालावधीत काळजी घेतली जावी, या हेतूने या योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. ही योजना पशुपालकांना दिलासा देईल आणि पर्यायी गोधनाची संख्या वाढवून त्याचा जिल्ह्याच्या दुग्ध उत्पादनात मोठा वाटा राहील, असे कृषी सभापती तापेश्वर वैद्य म्हणाले़ बैठकीला दीक्षा मुलताईकर, मेघा मानकर, देवानंद कोहळे, महेंद्र डोंगरे, प्रीतम कवरे आदी सदस्यांची उपस्थिती होती़
पशुधन पर्यवेक्षकाची पदे कंत्राटी पद्धतीवर भरणार
राज्यात पशुधन पर्यवेक्षकांची पदे १५ वर्षांपासून रिक्त होती़ जिल्ह्यातील राज्यस्तरीय पशू रुग्णालयात ४० ते ४५ पदे रिक्त आहेत़ संपूर्ण राज्यात ३५० पदे रिक्त होती़ त्यामुळे पशू रुग्णालय यंत्रणेवर अतिरिक्त ताण यायचा़ याबाबत सभापती तापेश्वर वैद्य यांनी पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्याकडे पाठपुरावा केला होता़ ही पदे कंत्राटी तत्त्वावर भरण्यास शासनाने मान्यता दिली आहे़ या पदभरतीने पशुधन विभागाचा भार कमी होणार आहे़