गैरप्रकाराला पोलिसांची मूकसंमती चौकशीत धक्कादायक माहिती उघड संबंधित अधिकारी अडचणीतनागपूर/कळमेश्वर : वरिष्ठांना अंधारात ठेवून महसूल तसेच पोलीस प्रशासनातील कनिष्ठ अधिकाऱ्यांनी कामठी खैरीतील बारसह जिल्ह्यात अनेक ठिकाणी फार्महाऊस आणि बार रेस्टॉरंटला ‘गैरप्रकाराची मूकसंमती’ दिल्याचे उघड झाले आहे. या सर्व गैरप्रकाराची वरिष्ठ पातळीवरून गंभीर दखल घेण्यात आल्याने परवानगी देणारे काही महसूल विभागाचे अधिकारी तसेच काही ठाणेदार अडचणीत आले आहेत. परिणामी या दोन्ही विभागात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.कळमेश्वरनजीकच्या बीटीपी फार्महाऊसमध्ये घडलेल्या पूर्वा हेडाऊ संशयास्पद मृत्युप्रकरणात अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत. सक्षम अधिकाऱ्यांची परवानगी नसताना या फार्महाऊसमध्ये अनेक गैरप्रकार बिनबोभाट सुरू होते. नागपुरातील वारांगनांची येथे सारखी वर्दळ राहायची. बुकी येथे नियमित खायवाडी, लगवाडीसोबतच जुगारही खेळायचे. नेहमीच डर्टी पार्ट्या व्हायच्या. डीजेच्या कर्णकर्कश आवाजासह सुरू असलेल्या धांगडधिंग्याची कळमेश्वर पोलिसांना नेहमीच तक्रारीच्या रूपाने माहिती मिळायची. फार्महाऊसचे संचालन करणाऱ्यांकडून महिन्याला एक ते दीड लाखाची देण मिळत असल्यामुळे या गैरप्रकारांकडे दुर्लक्ष व्हायचे. आॅर्केस्ट्राचा परवाना कसा?नागपूर : गुरुवारीसुद्धा असेच झाले. बर्थडे पार्टीच्या नावाखाली येथे डर्टी पार्टी झाली. त्यात सहभागी अनेक विद्यार्र्थी-विद्यार्थिनींनी दारू ढोसून नको ते वर्तन केले. या पार्टीत सहभागी झालेल्या पूर्वाचा स्विमिंग पूलमध्ये बुडून संशयास्पद मृत्यू झाला. यामुळेच या फार्महाऊसमधील गैरप्रकारासोबत कळमेश्वर पोलिसांचेही पाप उघडकीस आले. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी त्याची गंभीर दखल घेतली असून, कळमेश्वरसोबतच जिल्ह्यातील कुठे कुठे असे गैरप्रकार सुरू आहेत, त्याची माहिती काढण्यासाठी त्यांनी खास पथकाला कामी लावले आहे. या पथकाने दोन दिवसात अनेक फार्महाऊस तसेच काही बार आणि रेस्टॉरंट कसे नियमांचे उल्लंघन करून चालविले जातात, त्याची माहिती संकलित केली आहे. त्यातूनच उघड झालेल्या माहितीनुसार, कामठी खैरी मार्गावरील वेलकम बारला नियमांना बाजूला सारून अनेक परवानग्या दिल्याचे उघड झाले आहे. महसूल विभागातील आणि पोलीस ठाण्यातील काही अधिकाऱ्यांनी आपापल्या वरिष्ठांना अंधारात ठेवून परवानगी दिली. वेलकमचा बिल्डिंग मॅप मंजूर नसताना आॅर्केस्ट्राचा परवाना देण्यात आला. अग्निशमनच्या अटी-शर्तीची मंजुरी तसेच नाहरकत प्रमाणपत्र सादर केल्यानंतरच मनोरंजनाचा परवाना दिला जातो. मात्र या सर्वच प्रकाराकडे दुर्लक्ष करण्यात आल्याची धक्कादायक माहिती उघड झाल्याने आता परवाना देणारे हादरले आहेत. ग्रामीण भागात बार रेस्टॉरंट १०.३० पर्यंत सुरू राहावेत, असा नियम आहे. मात्र एका अधिकाऱ्याने बार रेस्टॉरंटला १२.३० ची वेळ दिली आहे. (प्रतिनिधी)सिराजवर दुसराही गुन्हा फार्महाऊसवर सुरक्षेच्या पुरेशा उपाययोजना न केल्यामुळे पूर्वाचा मृत्यू झाला, असा ठपका ठेवून कळमेश्वर पोलिसांनी फार्महाऊसचा मालक सिराज शेख याला अटक केली. तो सध्या पीसीआरमध्ये आहे. याच ठिकाणी गेल्या आठवड्यात दिघोरी येथील मनोज काटघाये याचा बुडून मृत्यू झाल्याचे लोकमतने ठळकपणे प्रकाशित केले होते. त्याची दखल घेत पोलिसांनी चौकशी केली. त्या तरुणाच्या मृत्युप्रकरणी हुडकेश्वर ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ग्रामीण पोलिसांनी ही केस डायरी स्वत:कडे मागून घेतली असून, या प्रकरणातही एक-दोन दिवसात सिराजवर गुन्हा दाखल होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
फार्महाऊस, बारमध्ये धांगडधिंगा
By admin | Published: September 14, 2015 3:00 AM