लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भगवान शंकराच्या महाशिवरात्रीच्या पर्वावर अनेक जण उपवास करतात. त्यामुळे या व्रताच्या प्रसादात टाकण्यासाठी साबुदाणा आणि शेंगदाण्याची मागणी वाढते. परंतु या वर्षी ११ मार्च रोजी साजऱ्या करण्यात येणाऱ्या महाशिवरात्रीसाठी शहरातील मस्कासाथ, इतवारीतील ठोक किराणा बाजारात साबुदाणा, शेंगदाणे, भगर, नायलॉन साबुदाणा महाग झाल्यामुळे या वस्तूंची मागणी मागील वर्षाच्या तुलनेत खूप कमी झाली आहे.
उपवासासाठी मागणी होत असलेल्या या वस्तूंची मागणी ४० ते ५० टक्क्यांनी कमी झाली असल्याची माहिती नागपूर इतवारी किराणा मर्चंट्स असोसिएशनचे माजी सचिव अशोक वाघवानी यांनी ‘लोकमत’ला दिली. या वर्षी महाशिवरात्रीनिमित्त साबुदाणा आणि शेंगदाण्याच्या दरात खूप कमी वाढ झाली असून साबुदाणा ५ रुपये तर शेंगदाणा १० रुपयांनी वाढला असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु भगर आणि नायलॉन साबुदाण्याच्या दरात वाढ झालेली नाही. कोरोनामुळे अनेकांची नोकरी गेली. इतर उत्पादनांचे व्यापारीही संकटात सापडले आहेत. अशा स्थितीत महाशिवरात्रीच्या पर्वावर नागपूर आणि ग्रामीण भागातील उपवासाच्या वस्तूंची मागणी कमी झाली आहे. आठवड्यातून दोन वेळा म्हणजे शनिवार आणि रविवारी लॉकडाऊन म्हणजे दुकाने बंद असल्यामुळे ग्रामीण भागातील चिल्लर किराणा व्यापारी खरेदीसाठी नागपुरात येत नाहीत. त्याचा परिणाम ग्राहकांवर होत असल्याची माहिती त्यांनी दिली. ठोक दरात काही दिवसांपूर्वी ४५ रुपयांत विकला जाणारा साबुदाणा आता ५ रुपये वाढ झाल्यामुळे ४९ रुपये किलो झाला आहे. यामुळे किरकोळ दर क्वालिटीनुसार ५० रुपयांवरून ५४ ते ५५ रुपये करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे शेंगदाणा पूर्वी ठोक दरात ७० ते ९० रुपये प्रति किलो विकण्यात येत होता. आता १० रुपये वाढल्यामुळे हा दर ८० ते १०० रुपये झाला आहे. किरकोळ दर ८० ते १०५ रुपयांवरून ९० ते ११० रुपये झाले आहेत. भगरचा भाव आताही ८८ रुपये प्रतिकिलो आहे. भगर किरकोळ दरात ९० ते ९५ रुपये किलो विकण्यात येत आहे. तसेच नायलॉन साबुदाणा ५८ रुपये किलो असून किरकोळ दर ६८ रुपये आहे.
उपवासाच्या वस्तूंचे दर
साबुदाणा ४९- ५४
शेंगदाणा ८०-१००, ९०-११०
भगर ८८ -९०-९५
नायलॉन साबुदाणा ५८- ६८
(दर प्रतिकिलोप्रमाणे असून स्थळ आणि क्वालिटीनुसार दरात फरक शक्य आहे)