लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आषाढ महिन्यानंतर व्रतांचे दिवस सुरू होतात. भक्ती आणि उपासनेचा श्रावण महिना ९ ऑगस्टपासून सुरू होत आहे. यंदा कोरोनाकाळातच किराणासह उपवासाच्या वस्तूंच्या दरात किलोमागे १० ते २५ रुपयांची तेजी आली आहे. त्यामुळे यंदा श्रावणात भाविकांचा उपवास महागणार आहे. गेल्या काही वर्षांत तयार उपवास पदार्थांना मागणी वाढल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
श्रावणात साबुदाणा, शेंगदाणा, भगर, पेंडखजूर, राजगिरा, उपवासाची भजणी, चिवडा, उपवासाचा चिवडा, नॉयलॉनच्या साबुदाण्याचा चिवडा आदी खाद्यपदार्थांना गेल्या काही वर्षांत मागणी वाढली आहे. किरकोळ किराणा दुकानात एक महिन्यापूर्वी साबुदाण्याचे दर ६० रुपये किलो होते. सध्या यात किलोमागे १० ते १५ रुपयांची वाढ झाली आहे. श्रावणात इतवारी ठोक बाजारात जवळपास २५० टन साबुदाण्याची आवक आणि विक्री होते. पावसाळ्यात भगरला जास्त मागणी असते. भाव १२० किलोवर पोहोचले असून, किलोमागे दर्जानुसार १० ते २० रुपयांची वाढ झाली आहे. श्रावणात जवळपास २० टन भगरची विक्री होत असल्याचे किराणा दुकानदार चंदू जैन यांनी सांगितले. उपवासाच्या दिवसात शेंगदाण्याला जास्त मागणी असते. भाव दर्जानुसार १०० ते १२० रुपये किलो आहेत. राजगिऱ्यातही ५ ते १० रुपयांची वाढ झाली असून भाव ७५ ते ८० रुपये आहेत. पेंडखजूरही २०० ते २५० रुपयांपर्यंत बाजारात उपलब्ध असून कोरोनानंतर विक्री वाढल्याचे जैन म्हणाले.
नागपूर इतवारी किराणा मर्चंट्स असोसिएशनचे माजी सचिव अशोक वाधवानी म्हणाले, कोरोनानंतर उपवासाच्या वस्तूंची मागणी शहरी आणि ग्रामीण भागात कमी झाली आहे. आठवड्यातून शनिवार व रविवारी लॉकडाऊनमुळे दुकाने बंद असल्याने ग्रामीण भागातील किरकोळ व्यापारी नागपुरात खरेदीसाठी येत नाहीत. त्याचा फटका व्यवसायाला बसला आहे.
सफरचंद २४० रुपये किलो
सध्या बाजारात फळांमध्ये सफरचंदाचे भाव सर्वाधिक आहेत. किरकोळ बाजारात दर्जानुसार २४० ते २६० रुपये किलो दराने विक्री होत आहे. सध्या केळीचे भाव ४० ते ५० रुपये डझन, मोसंबी ७० ते ८० रुपये, पपई ३० ते ५० रुपये किलो, डाळिंब ८० ते १०० रुपये किलो भाव असल्याचे सक्करदरा येथील फळ विक्रेते संतोष तिवारी यांनी सांगितले.
साबुदाणा ६०-७०
शेंगदाणा १००-१२०
भगर ११०-१२०
नॉयलॉन साबुदाणा ७०-७५