उमरेड (नागपूर) : मध्यरात्रीच्या सुमारास गस्त घालत असताना. सहा चाकी कंटेनरमधून संशयास्पद हालचाली आढळून येताच पाठलाग करणाऱ्या उमरेड पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षकावर हल्ला करण्यात आला. बट्टुलाल रामलोटन पांडे (५३) असे उपनिरीक्षकाचे नाव आहे. या हल्ल्यात प्रदीप चवरे नावाचा पोलीससुद्धा जखमी झाला आहे.
उमरेड येथून १८ किलोमीटर अंतरावरील मौजा मांडवा शिवार परिसरात सदर घटना बुधवारच्या मध्यरात्री घडली. बट्टुलाल पांडे यांनी प्रकृती स्थिर असून आरोपींची संख्या पाच ते सहा आहे. आरोपींचा तपास केला जात आहे.
बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास उपनिरीक्षक बट्टुलाल पांडे यांच्यासह तिलक रामटेके आणि प्रदीप चवरे हे दोन पोलीस हवालदार कर्तव्यावर होते. तिघेही (एम.एच.१२-एस.क्यू. १९७५) डायल क्रमांक ११२ या शासकीय वाहनासह गस्त घालत होते. दरम्यान सहा चाकी कंटेनरच्या केबिनमधून एका इसमाने एका पांढऱ्या रंगाचा बोरा बाहेर फेकला. संशयास्पद वाटल्याने कंटेनर थांबविण्याचा प्रयत्न करण्यात आला. अशातच कंटेनर चालकाने वाहनाचा वेग वाढवून पोबारा केला. लागलीच पोलिसांनी पाठलाग केला.
शिवनफळ शिवार परिसरात (मांडवा) कंटेनरच्या केबिनमधून बाहेर निघत पाच ते सहा जणांनी हा हल्ला केला. यामध्ये बट्टुलाल पांडे, प्रदीप चवरे जखमी झाले. आरोपी २५ ते ३५ वयोगटातील होते.
रॉडने केली मारहाण
पांडे यांच्या दोन्ही पायाला जबर मार बसला असल्याची माहिती आहे. आरोपींनी लोखंडी रॉडचा वापर केल्याचे समजते. शिवाय डायल क्रमांक ११२ या शासकीय वाहनाला सुद्धा कंटेनर चालकाने धडक दिली. उमरेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास प्रभारी पोलीस निरीक्षक महेश भोरटेकर यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश पाटील करीत आहेत.