नागपूर : मकरसंक्रांतीच्या दिवशी आपण एकमेकांना तीळगूळ देऊन गोड बोलण्याचा संकल्प करतो अन् आनंदाची देवाणघेवाण करतो. पण या सणाच्या नावाखाली शुक्रवारी दिवसभर सुरू असलेल्या पतंगबाजीच्या उन्मादाने एकाची हत्या झाली. दिवसभरात अनेक नागरिक आणि मुले जखमी झाली. आपल्या संस्कृतीचा आनंद साजरा करताना दुसऱ्याचा बळी घेणे किंवा जखमी करणे हे कुठेही सांगितलेले नाही. पण तरीही दिवसभर हे पतंगबाज रस्त्यांवर, घराच्या छतांवर अक्षरश: धुमाकूळ घालीत होते. पतंगबाजांचा हा उन्माद आणि मस्ती उतरविण्यासाठी कठोर कायदे करण्याची गरज आहे. आठ फिडरवर ब्रेक डाऊनशुक्रवारी पतंग उत्सवाचा स्पॅन्को नागपूर डिस्कॉम लिमिटेड (एसएनडीएल) आणि वीज ग्राहकांना चांगलाच फटका सहन करावा लागला. दिवसभर आकाशात उडविण्यात आलेल्या पतंगीमुळे शहरातील वेगवेगळ्या भागातील एसएनडीएलच्या आठ फिडरवर ब्रेकडाऊन झाले. यामुळे संबंधित परिसरातील वीज पुरवठा खंडित होऊन, त्याचा वीज ग्राहकांना त्रास सहन करावा लागला. यात मॉडेल मील फिडर, कळमना परिसर, वाडी, किनखेडे ले-आऊट, न्यू इंग्लिश स्कूल परिसर, बारसे घाट, हिवरी व दिघोरी येथील फिडरचा समावेश होता. विशेष म्हणजे, या समस्येचा सामना करू न, ताबडतोब वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी एसएनडीएलने खास पथक सज्ज केले आहे. या पथकाने शुक्रवारी दिवसभर शहरात पेट्रोलिंग केली. तज्ज्ञांच्या मते, नायलॉन मांजा हा दोन वीज तारांमध्ये अडकला की, तेथे ब्रेकडाऊन होतो. अशा स्थितीत तो मांजा किंवा पतंग काढण्याच्या प्रयत्नात अनेकदा अपघातही घडतो. त्यामुळे वीज तारांमध्ये अडकलेला मांजा किंवा पतंग कुणीही काढण्याचा प्रयत्न करू नये. असे एसएनडीएलतर्फे आवाहन करण्यात आले आहे. ‘लोकमत’ची भूमिकामकरसंक्रांतीच्या दिवशी पतंगबाजीच्या नावावर जो उन्माद उपराजधानीत सुरू होता तो चीड आणणारा आहे. आमचा पतंग उडविण्याला विरोध नाही. पतंग उडवीत असताना नायलॉनचा मांजा, काचेचा चुरा वापरणे, ‘डीजे’चा धुमाकूळ या गोष्टींना आमचा विरोध आहे. ‘लोकमत’ची हीच भूमिका आहे. हा उन्माद असणाऱ्यांना आमचा विरोध आहे आणि ही विकृती थांबविण्यासाठी सामाजिक संघटना व नागरिकांनी समोर येऊन पुढाकार घेण्याची गरज आहे.हुल्लडबाजीत ५० वर जखमीमकरसंक्रांती निमित्त शहरातील विविध भागात पतंगोत्सव उत्साहात साजरा झाला, मात्र काही जण कुणाची पतंग कशी कापता येईल, यासाठी स्पर्धा करीत होते. जास्तीत पतंग कापण्यासाठी काहींनी बंदी असतानाही नायलॉनच्या मांजाचा वापर केला. या मांजाने दिवसभरात ५० वर जखमी झाले. यात गळा व हात कापलेल्यांची संख्या सर्वाधिक होती. तर रस्त्यात पतंग आडवी आल्याने एका युवकाचा अपघात झाला असून एका खासगी इस्पितळात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. नायलॉनच्या मांजामुळे कुणाचे हात तर कुणाचा गळा कापलेले पाचवर रुग्णांनी मेयोत उपचार घेतले तर मेडिकलमध्ये सहा जणांवर उपचार करण्यात आले. यात कुणीच गंभीर नसल्याने तात्पुरता उपचार करून त्यांना घरी पाठविण्यात आले. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी जखमींची संख्या कमी झाल्याचेही दिसून आले,रविनगर चौक येथील दंदे हॉस्पिटलमध्ये मांजामुळे हात व गळा कापलेल्या दहावर किरकोळ रुग्णांवर उपचार करण्यात आले. पतंग आडवी आल्याने अपघात झालेल्या एका युवकावरही याच इस्पितळात उपचार सुरू आहेत. अजय सोमकुवर (३०) असे त्या युवकाचे नाव आहे. अजय काही कामानिमित्त धरमपेठ मार्गावर आपल्या दुचाकीने जात असताना अचानक पतंग आडवी आली. तिला पकडायला दोन मुलेही वाहनासमोर आल्याने तोल जाऊन पडला. यात तो जखमी झाला. त्याला दंदे हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. मानेवाडा, प्रतापनगर चौक, सदर, काटोल रोड, कोराडी रोड, कामठी रोड व उमरेड रोड मार्गावरील अनेक मोठ्या खासगी इस्पितळांतही मांजामुळे जखमी झालेल्या ३० वर रुग्णांवर उपचार झाल्याची माहिती आहे.
जीवघेणा उन्माद
By admin | Published: January 16, 2016 3:31 AM