- सुमेध वाघमारे नागपूर : शेतांमध्ये फवारणीची कामे सुरू आहेत. विदर्भात मात्र, कापूस व सोयाबीनवरील अळ्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेली कीटनाकशकांची फवारणी शेतकरी व शेतमजुरांनाच जीवघेणी ठरत आहे. विदर्भात फवारणीमुळे आतापर्यंत ३१६ जणांना विषबाधा झाली आहे. त्यापैकी १0 जणांच्या मृत्यूची नोंद झाली असून, शनिवारीही एक जण मरण पावला आहे. ही माहिती नागपूर मंडळाच्या आरोग्यसेवा उपसंचालकांनीच दिली. फवारणीमुळे विषबाधा झालेले सर्वाधिक रुग्ण व मृत्यू गोंदिया जिल्ह्यातील असल्याचे दिसून आले आहे.या वर्षी चांगला पाऊस, चांगली पिके आली. मात्र, किडीचा प्रादुर्भाव झाल्याने कीटकनाशक सुरू केलेली फवारणी शेतकरी व शेतमजुरांच्या जिवावर उठली आहे. गेल्या वर्षी यवतमाळ, अकोला, बुलडाणा, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, धुळे, नंदूरबार, जळगाव, नांदेड, अहमदनगर व सोलापूर जिल्ह्यांतील सुमारे ३४ शेतकरी व २९ शेतमजूर फवारणीमुळे विषबाधेने मरण पावले होते. त्यानंतर, विषबाधा टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय हाती घेतले.कीटकनाशकांची फवारणी करताना शेतकरी व शेतमजुरांनी प्रतिबंधात्मक किट म्हणजेच हातमोजे, चश्मा, मास्क, टोपी, अॅप्रॉन, बूट आदींचा वापर कटाक्षाने करण्याच्या सूचना दिल्या. फवारणी करणाऱ्या शेतमजुरांना किट पुरविण्याचे व विषबाधा झाल्यास प्रथमोपचाराचे साहित्य शेतावर उपलब्ध ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले. तरीही यंदा विषबाधेचे रुग्ण वाढत आहेत.गेल्या वर्षी २२ मृत्यू, ९०० बाधितयवतमाळ जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षीही कीटकनाशक फवारणीतून विषबाधा होऊन २२ शेतकºयांचा मृत्यू झाला होता, तसेच ९०० पेक्षा अधिक शेतकी व शेतमजुरांना विषबाधा झाल्याने, यवतमाळच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते.>सात जणांवर उपचार सुरूभंडारा जिल्ह्यातील आठ, गोंदियातील १२३, गडचिरोलीतील दोन, चंद्रपूर जिल्ह्यातील पाच व वर्धा जिल्ह्यातील ३३ असे मिळून १७१ रुग्ण आहेत. यातील १५८ रुग्णांवर उपचार करून घरी पाठविण्यात आले. सात रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यवतमाळमध्ये तीन महिन्यांत १०५ शेतकरी, शेतमजुरांना विषबाधा झाल्याची नोंद सरकारी दप्तरी आहे.>दोघे अत्यवस्थनागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अतिदक्षता विभागात विषबाधा झालेले दोन रुग्ण अत्यवस्थ असून, एक जण व्हेंटिलेटरवर आहे. दोन्ही रुग्ण मध्य प्रदेशातील आहेत.
कीटकनाशक फवारणी ठरतेय जीवघेणी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2018 6:51 AM