कन्हान (नागपूर) : दाम्पत्य त्यांच्या सहा महिन्याच्या चिमुकल्याला घेऊन कुटुंबातील व्यक्तीच्या अंत्ययात्रेत सहभागी हाेण्यासाठी माेटारसायकलने नागपूरहून बालाघाटला (मध्य प्रदेश) जायला निघाले. वाटेत भरधाव ट्रकने त्यांच्या माेटारसायकलला जाेरात धडक दिल्याने वडील व चिमुकल्याचा मृत्यू झाला, तर चिमुकल्याची आई गंभीर जखमी झाली.
ही घटना कन्हान (ता. पारशिवनी) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर - जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील टेकाडी शिवारात साेमवारी (दि. २) दुपारी १.४५ वाजेच्या सुमारास घडली. त्यामुळे अंत्ययात्रेत सहभागी हाेण्यापूर्वीच वडील व चिमुकल्याची अंत्ययात्रा काढावी लागली. शैलेश मदनलाल चौधरी (३०) व साहील शैलेश चौधरी (६ महिने) अशी दुर्दैवी मृत वडील व चिमुकल्याचे नाव असून, मीना शैलेश चौधरी (२५) असे जखमी आईचे नाव आहे. शैलेश चाैधरी हे मूळचे टेकाडी, जि. बालाघाट (मध्य प्रदेश) येथील रहिवासी असून, ते कामानिमित्त काही वर्षांपासून कुटुंबीयांसह नागपूर शहरातील समतानगरात राहायचे.
त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीचे निधन झाल्याने ते त्यांच्या पत्नी व सहा महिन्यांच्या चिमुकल्याला घेऊन मोटारसायकलने (क्र. एमएच ३४ पी ८३४३) नागपूरहून टेकाडी (मध्य प्रदेश) येथे जायला निघाले. ते टेकाडी (ता. पारशिवनी) शिवारातील ओव्हरब्रिजवर पाेहाेचताच मागून वेगात आलेल्या ट्रकने (क्र. एमएच ४० वाय ९४९८) त्यांच्या माेटारसायकलला जाेरात धडक दिली. त्यात शैलेश व साहिलचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर मीना गंभीर जखमी झाल्या.
चिमुकला साहिल व तापलेल्या रोडचे चटके
या ट्रकने धडक देताच तिघांनाही काही दूर फरफटत नेले. त्यामुळे चिमुकला साहिल त्याच्या आईच्या हातातून सुटला. हा रोड सिमेंटचा असून, अपघात दुपारी झाल्याने रोडही प्रचंड तापलेला होता. त्यामुळे सहा महिन्यांच्या साहिलला एकीकडे वाहनाच्या धडकेच्या जखमा तर दुसरीकडे प्रचंड तापलेल्या सिमेंट रोडचे चटके सहन करावे लागले. अशा अवस्थेत त्याने रोडवरच शेवटचा श्वास घेतला.