नागपूर : कोंढाळी येथील पोलीस ठाण्यांतर्गत कोंढाळी-नागपूर मार्गावर शिवा फाट्यानजीक नागपूरकडे जाणाऱ्या ट्रेलरला मागून येणाऱ्या कारने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातातकारचालक पित्यासह त्याच्या ५ महिन्याच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. तर, पत्नी व एक ८ वर्षाची मुलगी गंभीर जखमी झाली असून महिलेची प्रकृती चिंताजनक आहे. हा अपघात आज (दि. १९) दुपारी १२ च्या सुमारास घडला.
रोषन रामाजी तागडे (वय २८), राम रोषन तागडे (वय ५ महिने) रा.कोंढाळी अशी मृतकांची नावे आहेत. तर, आचल रोषन तागडे (वय २३) व जोया आकाश मेश्राम (वय ८) अशी जखमींची नावे आहेत. ते कारने कोंढाळीहून नागपूरकडे जात होते.
कोंढाळी येथील रहवाशी असलेला रोशन हा नागपूर येथील कलमना पोलीस चौकीजवळ राहत होता. तो ट्रकचालक म्हणून काम करायचा. १८ फेब्रुवारीला लग्नसमारंभानिमित्त रोषन, पत्नी आंचल, मुलगा राम व साळ भावाची मुलगी जोया आकाश मेश्रामसह कारने (एम.एच. ४९ एफ ०८७५) कोंढाळीला आला होता.
आज ते कोंढाळीहुन नागपूरला परतत होते. दरम्यान, दुपारी १२ वाजता कारसमोर असलेल्या ट्रेलर (एम.एच ४० बी.एल. ४२५४) चालकाने आपला ट्रेलर थांबविण्यासाठी अचानक डावीकडे वळवला. यावेळी, भरधाव असलेल्या कारने ट्रेलरला जोरदार धडक दिली. या घटनेत कार सरळ ट्रेलरमध्ये घुसली. यात रोषण व त्याचा मुलगा राम हे दोघे जागीच ठार झाले तर, पत्नी आंचल व साळ भावाची मुलगी जोया या दोघी जखमी झाल्या.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना उपचारासाठी नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे रवाना केले. या प्रकरणी, कोंढाळी पोलीसांनी ट्रेलरचालक राजेश मधुकर ठवरे (वय ४५ रा.पारडी नागपूर) याला ताब्यात घेतले. ट्रेलर मुंबईकडून लोखंडी कॉईल घेवून नागपूरकडे जात होता. घटनेचा पुढील तपास कोंढाळीचे सहाय्यक पोलीस निरिक्षक अजित कदम हे करीत आहेत.