नागपूर : मुलाचे आधारकार्ड अपडेट करण्यासाठी मुलासोबत आधारकार्डच्या सेंटरवर गेलेल्या वडिलांना भरधाव कारने धडक दिल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. ही घटना कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली.
बळीराम तुकाराम मस्के (५०, रा. पेट्रोल पंपाच्या मागे, कामनानगर, कळमना) असे या अपघाताच मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते बुधवारी २६ जूनला दुपारी २ वाजता मुलाचे आधारकार्ड अपडेट करण्यासाठी शिवशक्ती बारजवळ शांतीनगरकडे जाणाऱ्या रोडवर मर्दीना हॉस्पीटलसमोर असलेल्या आधारकार्डच्या सेंटरमध्ये गेले होते. त्यांचा मुलगा आधार सेंटरच्या आतमध्ये गेल्यानंतर ते बाहेर उभे होते.
तेवढ्यात पांढऱ्या रंगाची कार क्रमांक एम. एच. ४०, बी. डब्ल्यू-४०६९ चा चालक राहुल तेजराम करारे (३३, रा. जुना कामठी रोड, कळमना वस्ती) याने आपल्या ताब्यातील कार भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून बळीराम यांना धडक देऊन गंभीर जखमी केले. त्यांना उपचारासाठी मेयो रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी बबनराव लक्ष्मणराव ठाकरे (६५, रा. कामनानगर, कळमना) यांनी दिलेल्या तक्रारीवरून कळमना ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गव्हाणे यांनी कार चालकाविरुद्ध कलम २७९, ३३८, ३०४ (अ) नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.