आॅनलाईन लोकमतनागपूर: दोन्ही मूत्रपिंड निकामी झाल्याने मृत्यूच्या दारात उभ्या असलेल्या तरुण मुलाला पित्याने किडनी दान करून जीवनदान दिले. मेडिकलशी संलग्न सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये या तरुणावर किडनी प्रत्यारोपणाची शल्यक्रिया यशस्वी झाली.शासकीय रुग्णालयामध्ये सर्वाधिक म्हणजे २५ मूत्रपिंड प्रत्यारोपण करणारे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे राज्यातील एकमेव रुग्णालय ठरले आहे. अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांच्या मार्गदर्शनात आतापर्यंत मृत्यूच्या दारात उभ्या २५ जणांना जीवनदान मिळाले.कमलेश गुप्ता (वय ३२) असे मूत्रपिंड प्रत्यारोपण झालेल्या तरुणाचे नाव आहे. कमलेशला त्याचे वडील श्यामलाल यांनी आपली किडनी दान केली. मजुरीवर गुजराण करणाऱ्या श्यामलाल यांचा मुलगा मे महिन्यापासून दोन्ही मूत्रपिंड निकामी झाल्याने डायलिसिसवर जगत होता. उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याने अस्वस्थ झाल्यानंतर कमलेशला कुटुंबीयांनी रुग्णालयात तपासणीसाठी आणले. मे महिन्यात चाचणी केल्यानंतर त्याच्या दोन्ही किडनी निकामी झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले. तेव्हापासून कमलेशवर दरमहा डायलिसिसवर उपचार सुरू होते. वडील श्यामलाल यांनी आपली किडनी दान करण्याचा निर्णय घेतल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यात आली. बुधवारी सुपरच्या टीमने तातडीने पुढाकार घेत कमलेशवर किडनी प्रत्यारोपणाची शल्यक्रिया यशस्वी केली.
प्रत्यारोपण चमूअधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांच्या मार्गदर्शनात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे विशेष कार्यअधिकारी डॉ. मधुकर परचंड यांच्या सहकार्याने मूत्रपिंड प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. संजय कोलते, डॉ. समीर चौबे, नेफ्रॉलॉजी विभागप्रमुख डॉ. चारुलता बावनकुळे, युरोलॉजिस्ट डॉ. धनंजय सेलुकर, डॉ. विशाल रामटेके, भूलतज्ज्ञ डॉ. विजय श्रोते, मूत्रपिंड प्रत्यारोपण समन्वयक डॉ. मोहम्मद मेहराज शेख यांच्या टीमने ही मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शल्यक्रिया यशस्वी केली. रक्त व इतर चाचण्यांसाठी सुपरच्या रक्तपेढीचे प्रमुख डॉ. संजय पराते, डॉ. संजय सोनुने व डॉ. भूषण महाजन यांनीही मदत केली.