नागपूर : सामाजिक कार्यकर्ता ८४ वर्षीय फादर स्टेन स्वामी यांचा कारागृहात नैसर्गिक मृत्यू नाही तर संस्थानिक हत्या करण्यात आली, असा आराेप नक्षलवाद्यांच्या केंद्रीय कमिटीने केला आहे. कमिटीने एक निवेदन जाहीर करीत सरकारने बेजबाबदारपणा केल्याचा आराेपही संघटनेने केला आहे. फादर स्टेन यांच्या मृत्यूने आदिवासींचे माेठे नुकसान झाल्याचे मतही व्यक्त केले.
नक्षलवाद्यांच्या केंद्रीय कमिटीचे प्रवक्ता अभयने जाहीर केलेल्या निवेदनात भीमा-काेरेगाव प्रकरणात अटक झालेल्या सर्व सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांच्या सुटकेसाठी आता आंदाेलनाचा पवित्रा घेतला जाईल, असे सांगितले. तसेच भीमा-काेरेगाव प्रकरण विनाअट परत घेण्यासाठी आवाज बुलंद करणे हीच फादर स्टेन स्वामी यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे स्पष्ट केले. यासाठी लेखक, कलावंत, गायक, वकील, पत्रकार, जनवादी बुद्धिवादी आणि देशभक्तांनी पुढे येण्याचे आवाहन नक्षलवादी संघटनेने केले आहे.