दयानंद पाईकराव
नागपूर : गुरुवारी रात्री मुंबई मार्गावरील कसारा ते इगतपुरी दरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळावर माती, दगड आल्यामुळे आणि रेल्वे रुळ वाहून गेले. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी मुसळधार पावसाची धास्ती घेतली असून दोन दिवसात ४९४७ प्रवाशांनी आपला प्रवासाचा बेत रद्द केला आहे.
कसारा ते इगतपुरी दरम्यान रेल्वे रुळावर माती, दगड आल्यामुळे तसेच रेल्वे रुळ वाहून गेल्यामुळे मुंबई-हावडा मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. नागपूरवरून मुंबईला जाणारी विदर्भ एक्स्प्रेस चाळीसगावला, दुरांतो एक्स्प्रेस भुसावळला तर सेवाग्राम एक्स्प्रेस नाशिकला समाप्त करण्यात आली होती. तसेच २२ जुलै रोजी मुंबईवरून नागपूरला येणारी विदर्भ एक्स्प्रेस, दुरांतो एक्स्प्रेस आणि मुंबई-हावडा मेल रद्द करण्यात आली होती. मुसळधार पावसामुळे आपण मध्येच अडकून पडू अशी भीती रेल्वे प्रवाशांना वाटत असल्यामुळे बहुतांश प्रवासी आपला प्रवासाचा बेत रद्द करीत असल्याची माहिती आहे. त्यामुळे २१ जुलै रोजी २२४३ प्रवाशांनी प्रवासाचा बेत रद्द करून तिकिटे रद्द केली. रेल्वेला त्यांना १३.४७ लाख रुपये परत करावे लागले. सलग दुसऱ्या दिवशी २२ जुलै रोजी २७०४ प्रवाशांनी तिकिटे रद्द केल्यामुळे रेल्वेला १५.७२ लाख परत करण्याची पाळी आली. यात मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली. सध्या सर्व मार्गावरील रेल्वे वाहतूक सुरळीत झाली असून रेल्वेगाड्या आपल्या नियोजित वेळेवर धावत आहेत. परंतु ‘रिस्क’ नको म्हणून प्रवासी प्रवास करण्याचे टाळत असल्याचे दोन दिवसांच्या आकडेवारीवरून सिद्ध झाले आहे.
...........