लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील रहाटेनगर टोली ही मांग गारुडींची वस्ती. व्यसनांच्या विळख्यात हरविलेली मुले. शिक्षणाचा गंध नसल्याने येथील विकास खुंटलेला. कचरा वेचणे, केस गोळा करणे आणि पोटाची भूक भागविणे हेच त्यांचे विश्व. अशा दरिद्री वातावरणाला बदलण्याचा वसा त्याने घेतला आणि लहानग्यांना हाताशी धरून अ, आ, इ, ई गिरवायला सुरुवात केली. १४ वर्षापूर्वी चार बालकांसोबत रस्त्यावरून सुरू झालेला त्याचा प्रवास आज ३५० बालकांपर्यंत पोहचला. शाळेत पाऊलही न टाकणारी ही मुले आज पदवीपर्यंत पोहचली. त्याने आपल्या नोकरीच्या मिळकतीतून अनेकांना आर्थिक हातभार लावला. अनाथांना दत्तक घेतले. स्वत:पुरते, कुटुंबापुरतेच विश्व समाजणाऱ्या, सामाजिक जाणिवांचा कधी स्पर्शही न झालेल्या या समाजाला त्याने एक प्रकाशवाट दाखविली.समाजभान जपणाऱ्या या युवकाचे नाव आहे खुशाल ढाक. खुशाल टोलीला लागून असलेल्या भीमनगरात राहतो. एमए बीएडपर्यंत शिक्षण घेतलेला खुशाल एका खासगी कंपनी कम्प्युटर ऑपरेटर म्हणून काम करतो. खुशालचे बालपण काहीसे अशाच परिस्थितून गेले. यशवंत स्टेडियमसमोरील पावभाजीच्या ठेल्यावर प्लेटा साफ करणाऱ्या खुशालला शिक्षणाची आवड होती. बालपणापासून दुर्लक्षित घटकासाठी काम करण्याची मानसिकता त्याची होती. आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर खुशालने रहाटेनगर टोलीमध्ये काम करण्यास सुरुवात केली. तेथील वातावरण, लोकांच्या मानसिकतेचा सुरुवातीला प्रचंड त्रास झाला. प्रसंगी विरोध पत्कारून मारही खावा लागला. मात्र जिद्द सोडली नाही. रस्त्यावर चार मुलांना घेऊन त्याने शिकवायला सुरूवात केली. मुलांमध्ये शाळेप्रती गोडी वाढविली. त्यांच्या आईवडिलांचा विश्वास संपादन केला. याच समाजातील नागेश मानकर याने त्याला साथ दिली. शाळाबाह्य मुलांना त्याने शाळेत दाखल केले. सायंकाळी त्यांना शिकवायला सुरुवात केली. कधी रस्त्यावर भरणाऱ्या त्याच्या शाळेला आज छत मिळाले आहे. वस्तीतील शेकडो मुले त्याच्या मार्गदर्शनात शिक्षण घेत आहेत. काही मुलांनी पदवी परीक्षाही उत्तीर्ण केली आहे.आईकडून मिळाली प्रेरणाखुशालला त्याच्या आईकडून प्रेरणा मिळाली. त्याची आई अंगणवाडी सेविका होती. ती गरीब व उपेक्षित मुलांना शिकविण्याचे काम करीत होती. आईचे काम बघून त्यानेही अशा मुलांना शिक्षित करण्याचा वसा घेतला.खेळातून सोडविले मुलांचे व्यसनयेथील लहान लहान मुले गुटखा, तंबाखू, थिनरचे सेवन करीत होती. कितीही समजविण्याचा प्रयत्न केला तरी ऐकत नव्हती. या मुलांना खेळाकडे आकर्षित केले. त्यांना फुटबॉलची आवड लावली. झोपडपट्टी फुटबॉल टीम तयार केली. आज ही टीम संतोष ट्रॉफीपर्यंत मजल मारण्याचे धाडस करीत आहे. या खेळामुळे अनेक मुलांचे व्यसन सुटले आहे.अनाथांना घेतले दत्तकखुशाल कॉम्प्युटर ऑपरेटरच्या नोकरीतून पोटापुरती कमावतो. मात्र वंचितांच्या आधार देण्यासाठी सदैव धडपडतो. आई-वडिलांचे छत्र हरविलेल्या अशा मुलांना त्याने दत्तक घेतले आहे. त्यांचे वसतिगृहात पुनर्वसन करून, त्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलला आहे. त्याच्या या समाजकार्यात त्याच्या पत्नीचाही मोठा वाटा आहे.हक्काची शाळा मिळवून देण्याचा प्रयत्न३५०० लोकवस्ती असलेल्या टोलीमध्ये राहणाऱ्या मुलांसाठी हक्काची शाळा उघडण्याचा खुशालचा प्रयत्न आहे. आपल्या जीवनाचा बहुतांश वेळ या वस्तीमधील मुलांसोबत घालविणारा खुशाल म्हणतो ‘कुछ मुश्किल नही है जीवन में, तू जरा हिम्मत तो कर, ख्वाब बदलेंगे हकीकत मे, तू जरा हिम्मत तो कर...’