लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आपल्या ‘दाना’मुळे कोणाच्या आयुष्यात रंग भरला जावा, कुणाच्या जीवनात आनंद निर्माण व्हावा, हा मानवतावादी दृष्टिकोन ठेवत वडील गेल्याचा असह्य दु:खातही १९ वर्षीय मुलीने धाडस दाखवित त्यांचा अवयवदानाचा आग्रही निर्णय घेतला. मानवतावादी या दृष्टिकोनामुळे दोघांना दृष्टी तर दोघांना जीवनदान मिळाले. नववर्षातील हे पहिले तर आतापर्यंत ६८ दात्यांकडून अवयवदान झाले.
नरेश प्रेमलाल मेश्राम (४६) रा. मरार टोली गोंदिया त्या अवयवदाता वडिलाचे नाव. प्राप्त माहितीनुसार, ‘एसईसी’ रेल्वेचा कर्मचारी असलेले मेश्राम यांना ३० डिसेंबर रोजी अपघात झाला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना गोंदिया येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. प्रकृती ढासळत असल्याने ३ जानेवारीला नागपुरातील एका खासगी रुग्णालयात स्थानांतर करण्यात आले. उपचार सुरू असताना डॉक्टरांच्या एका पथकाने त्यांचा मेंदू मृत झाल्याची माहिती कुटुंबीयांना दिली. मेश्राम यांच्या पत्नी श्रीदेवी मेश्राम, १९ वर्षाची सुनधी मेश्राम व तिच्या बहिणीसह संपूर्ण कुटुंबावरच दु:खाची कुऱ्हाड कोसळली. सामाजिक कार्यकर्ता शुभांगी पोकळे व ‘झोनल ट्रान्सप्लान्ट कोऑर्डिनेशन सेंटर’च्या (झेडटीसीसी) समन्वयिका वीणा वाठोरे यांनी कुटुंबीयांना अवयवदानाची माहिती दिली. त्या दु:खातही मुलगी सुनधी हिने वडिलांच्या अवयवदानासाठी पुढाकार घेतला. ‘झेडटीसीसी’च्या अध्यक्ष डॉ. विभावरी दाणी व सचिव डॉ. संजय कोलते यांच्या मार्गदर्शनात अवयवदानाची पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
न्यू इरा हॉस्पिटलमध्ये ३०वे यकृत प्रत्यारोपण
अवयवदानातून न्यू इरा हॉस्पिटलला मिळालेल्या यकृताचे आज ५६ वर्षीय पुरुषावर यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले. या रुग्णालयातील हे ३० वे यकृत प्रत्यारोपण होते. ही शस्त्रक्रिया डॉ. राहुल सक्सेना, डॉ. साहिल बन्सल, डॉ. सुशांत गुल्हाने, डॉ. अश्विनी चौधरी यांनी केली. केअर हॉस्पिटलमधील २५ वर्षीय पुरुषावर मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्यात आले. ही शस्त्रक्रिया वरुण भार्गव यांच्या मार्गदर्शनात डॉक्टरांच्या चमूने यशस्वी केली. दुसरे मूत्रपिंड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील रुग्णाला देण्याचा निर्णय घेण्यात आला, परंतु रुग्णाची प्रकृती खालवल्याने दुसऱ्या एका खासगी रुग्णालयातील ३५ वर्षीय महिला रुग्णावर मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण करण्यात आले.
हृदयासाठी रुग्ण मिळालाच नाही
वडिलांचे हृदय सुद्धा दान व्हावे यासाठी मुलगी सुनधी आग्रही होती. नागपूरच्या ‘झेडटीसीसी’कडून राज्यासह संपूर्ण देशात त्या संदर्भातील ‘अलर्ट’ देण्यात आला होता. परंतु रक्तगट जुळणारा रुग्ण उपलब्ध झाला नाही, अशी माहिती वीणा वाठोरे यांनी दिली.
३०० रुग्णांना मूत्रपिंडाची तर १०० रुग्णांना यकृताची प्रतीक्षा
‘झेडटीसीसी’ने उपलब्ध करुन दिलेल्या माहितीनुसार मूत्रपिंडासाठी ३०० रुग्ण तर यकृातसाठी १०० रुग्ण प्रतीक्षेत आहेत. आज झालेले मूत्रपिंड प्रत्यारोपण हे ११८ वे होते. यकृत प्रत्यारोपण ३९ वे होते.