लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :‘ब्रेन स्ट्रोक’मुळे कोमात जाऊन पुढे ‘ब्रेन डेड’ झालेल्या वडिलांच्या असह्य दु:खात मुलगा होता. त्यातही स्वत:ला सावरत आपल्या माणसाचे अस्तित्व कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याच्या व कुटुंबाच्या या संयम आणि मानवतावादी निर्णयामुळे चार रुग्णांना जीवनदान तर दोघांना दृष्टी मिळाली.
दिनेश सखाराम सोनवणे, रा. सिडको, तुरकमारी, टाकळघाट त्या अवयवदात्याचे नाव. सोनवणे यांचे बुटीबोरीत फोटो स्टुडिओ व चष्म्याचे दुकान आहे. अचानक त्यांना ‘स्ट्रोक’ आल्याने बेशुद्धावस्थेत रामदासपेठेतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न सुरू असताना मंगळवारी रात्री सोनवणे यांचा मेंदूमृत झाला. याची माहिती डॉक्टरांनी नातेवाईकांना दिली. कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाने सोनवणे कुटुंबीयांचे सांत्वन करीत अवयवदानाविषयी समुपदेशन केले. सोनवणे यांचा २१ वर्षीय मुलगा सूयशने अवयव दानासाठी पुढाकार घेतला. सूयशची आई सारिका, बहीण मनस्वी यांनी त्या निर्णयाला दुजोरा दिला. याची माहिती, अवयव प्रत्यारोपण समितीच्या अध्यक्ष डॉ. विभावरी दाणी, सचिव डॉ. संजय कोलते यांना देण्यात आली. पुढील प्रक्रिया समन्वयिका वीणा वाठोरे यांनी पूर्ण केली. प्रतीक्षा यादीनुसार हृदय मुंबईचे रिलायन्स रुग्णालय, एक मूत्रपिंड सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालय, दुसरे न्यू ईरा रुग्णालय तर यकृत रामदासपेठ येथील खासगी रुग्णालयातील रुग्णाला देण्यात आले. डोळे माधव नेत्रपेढीस दान करण्यात आले.