नागपूर : बापाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार हा मानवतेविरुद्धचा आणि दुर्मीळातला दुर्मीळ गुन्हा आहे, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात नोंदविले. या निर्णयाद्वारे नराधम बापाची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवण्यात आली.
न्यायमूर्तीद्वय महेश सोनक व पुष्पा गणेडीवाला यांनी हा निर्णय दिला. हे प्रकरण बुलडाणा जिल्ह्यातील साखरखेडा येथील असून, आरोपी व्यवसायाने मजूर आहे. तो स्वत:च्या अल्पवयीन मुलीवर सतत बलात्कार करीत होता. दरम्यान, मुलीचा दोनदा गर्भपात करण्यात आला. तिसऱ्यावेळी मुलीने बाळाला जन्म दिल्यामुळे आरोपीचे कुकृत्य पुढे आले. डीएनए चाचणीवरून नवजात बाळाचा बापच आरोपी असल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर विशेष सत्र न्यायालयाद्वारे जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आल्यामुळे आरोपीने त्याविरुद्ध उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने रेकॉर्डवरील ठोस पुरावे लक्षात घेता वरील निरीक्षण नोंदवून ते अपील फेटाळून लावले.
मुलीचा विश्वस्त असतो बाप
बाप हा मुलीसाठी ताकद, आधार व विश्वस्त असतो. मुलीचे संरक्षण करणे बापाची जबाबदारी असते; परंतु या प्रकरणात बापानेच मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त केले. हा अत्यंत अश्लील, जघन्य व खुनापेक्षाही अधिक गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे आरोपीविषयी कठोर भूमिका घेणे आवश्यक आहे, असेदेखील न्यायालयाने हा निर्णय देताना नमूद केले.