धावत्या गाडीत शोधमोहिम : कुटुंबीयांना मिळाला दिलासाचार्ल्स साळवे नागपूरबिहारला गेलेल्या वडिलांचा अचानक संपर्क तुटला. मुलगी आणि पत्नी चिंतेत पडल्या. वडील प्रवास करीत असलेल्या रेल्वेगाडीच्या मार्गावरील सर्व स्थानकावर संपर्क साधला. परंतु काहीच प्रतिसाद मिळाला नाही. अखेर या व्यक्तीची मुलगी समिधाने थेट रेल्वेमंत्र्यांना टिष्ट्वटरवर टिष्ट्वट करून घडलेल्या घटनेची माहिती देऊन मदत मागितली. त्याची कॉपी नागपूर, राची आणि बोकारोच्या ‘डीआरएम’ला पाठविली. संपूर्ण यंत्रणा कामाला लागली. संबंधित रेल्वेगाडीत रेल्वेच्या टीटीई आणि अधिकाऱ्यांनी शोध घेऊन काही वेळातच समिधाच्या वडिलांचा शोध लागला.कमलेश कुमार सिंग (४६) रा. सोमलवाडा हे व्यवसायाने व्यापारी असलेले व्यक्ती मूळचे बिहार येथील रहिवासी आहेत. ते आपल्या मूळ गावी गेले होते. तेथून ते रविवारी ६ मार्चला पहाटे ३.३० वाजता रेल्वेगाडी क्रमांक १७००६ रक्सॉल-हैदराबाद या गाडीने नागपूरकडे परतत होते. परंतु रेल्वेगाडीत त्यांचा मोबाईल चोरीला गेल्यामुळे त्यांचा संपर्क तुटला. त्यांचे कुटुंबीय मोबाईलवर संपर्क साधत होते. रिंग वाजत होती, परंतु कुणीच फोन उचलत नव्हते. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय चिंता करीत होते. व्यवसायाने ते व्यापारी असल्यामुळे कुटुंबीयांना घातपाताची शंका येत होती. सोमवारी सायंकाळी त्यांचा मोबाईलही बंद पडला. त्यामुळे कुटुंबीय आणखीनच घाबरले. त्यांची मुलगी समिधा बंगळुरुला संगणक अभियंता म्हणून कार्यरत आहे. तिने आपल्या वडिलांच्या मार्गावर असलेल्या प्रत्येक रेल्वेस्थानकावर संपर्क साधून तेथील स्टेशन व्यवस्थापकांना वडिलांबद्दल माहिती दिली. परंतु तिला काहीच प्रतिसाद मिळाला नाही. समिधाने रेल्वे मंत्र्यांकडे टिष्ट्वटरवर टिष्ट्वट केल्यास मदत मिळत असल्याचे ऐकले होते. त्यानुसार त्यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना टिष्ट्वटरवर टिष्ट्वट करून त्याची प्रत नागपूर, राची आणि बोकारोच्या ‘डीआरएम’ला पाठविली. लगेच रेल्वे यंत्रणा कामाला लागली. त्यांनी या गाडीतील टीटीई आणि रेल्वे अधिकाऱ्यांच्या मदतीने धावत्या गाडीत समिधाच्या वडिलांचा शोध घेऊन त्यांचे त्यांच्या कुटुंबीयांशी बोलणे करून दिले. वडील मिळाल्याबद्दल समिधाने टिष्ट्वट करून रेल्वेमंत्री आणि संबंधित ‘डीआरएम’चे आभार व्यक्त केले. (प्रतिनिधी)
रेल्वेमंत्र्यांना टिष्ट्वट केल्यामुळे लागला वडिलांचा शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2016 3:36 AM