किडनी प्रत्यारोपणासाठी आई तयार पण पैसा येतोय आड : अनिकेतला हवे मदतीचे बळनागपूर : दहावीत ९३ टक्के गुण घेऊन अभियंता होण्याचे स्वप्न बाळगणारा अनिकेत पॉलिटेक्निकच्या दुसऱ्या वर्षात असतानाच त्याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या. वडिलांच्या साडेतीन हजार पेन्शनवर कसेतरी घर चालणाऱ्या या कुटुंबावर कुऱ्हाडच कोसळली. पोराला वाचविण्यासाठी वडिलांनी भविष्य निर्वाह निधीतून मिळालेला पैसा उपचारावर खर्च केला. परंतु प्रकृती अधिकच गंभीर झाली. डॉक्टरांनी शेवटचा सल्ला दिला, किडनी प्रत्यारोपणाचा. आईने पुढाकार घेत, किडनी घ्या, पण पोराला वाचवा, अशी विनंती केली. मात्र, या शस्त्रक्रियेसाठी लागणारा पैसा आड आला. अनिकेतवर उपचार करण्याची कुटुंबाची परिस्थती राहिली नाही. त्यामुळे मुलाला जगवावे तरी कसे, या चिंतेने या गरीब कुटुंबाचे जीणे हराम झाले आहे. उपाध्ये रोड महाल येथील रहिवासी असलेले अनंत पंचभाई यांचा अनिकेत हा एकुलता एक मुलगा. त्याची मोठी बहीण शिक्षण घेत आहे तर आई गृहिणी आहे. अनंत पंचभाई हे ‘चितळे प्रेस’मधून २०११ मध्ये निवृत्त झाले. साडेतीन हजार रुपयांच्या पेन्शनवर कसेतरी कुटुंबाचा प्रपंच चालवित होते. अनिकेत लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होता. दहावीत त्याने ९३ टक्के गुण घेतले. त्याला अभियंता व्हायचे होते. घरची परिस्थिती हलाकीची असतानाही वडिलांनी त्याला पॉलिटेक्निक करण्यास प्रोत्साहन दिले. सर्व काही सुरळीत सुरू असताना गेल्या वर्षी मार्च महिन्यात त्याची प्रकृती ढासळली. डॉक्टरांचे उपचार सुरू झाले परंतु दोन्ही किडन्या निकामी झाल्या. अनिकेतचे वडील म्हणाले, अचानक आलेल्या या संकटाने घाबरून गेलो. काय करावे कळत नव्हते. तेव्हा एकच जिद्द पकडली मुलाला बरे करायचे. भविष्य निर्वाह निधीतून मुलांवर उपचार सुरू केले. डॉक्टर व डायलिसीसच्या खर्चावर आतापर्यंत आठ लाख रुपये खर्च झाले. आता हातचे सर्वच संपले. डॉक्टरांनीही अनिकेतची ढासळती प्रकृती पाहून लवकरात लवकर किडनी प्रत्यारोपणाचा सल्ला दिला. त्याची आई, किडनी घ्या पण पोराला वाचवा, असे नेहमीच म्हणते. डॉक्टरांनी तिची तपासणी केल्यावर आईची किडनी मुलाला लागू शकते असा सल्ला दिला. मात्र, किडनी प्रत्यारोपणासाठी साडेपाच लाखांचा खर्च आणि त्यानंतर औषधे व उपचारासाठी पाच लाख असा सुमारे दहा लाखांचा खर्च सांगितला. हा खर्च आमच्या आवाक्याबाहेरचा आहे. समाजाचे आर्थिक पाठबळ मिळाल्यास अनिकेत वाचेल, ही एकमेव आशा असल्याचे हात जोडत अनिकेतचे वडील म्हणाले. तरुण वयातच नियतीचे कठोर आघात सोसण्याची वेळ अनिकेतवर आली आहे. त्याला गरज आहे ती समाजाने मदतीचा हात देण्याची. हीच मदत त्याला पुन्हा एकदा लढण्याचे बळ-जगण्याची उभारी देऊ शकते. अनिकेतला मदत करू इच्छिणाऱ्यांनी आयडीबीआय बँक, त्रिमूर्तीनगर नागपूर येथील बँक खाते क्रमांक १०३४१०४००००५९५७४ यावर धनादेश अथवा धनाकर्ष पाठवून मदत करावी. अनंत पंचभाई यांना ७७९८६२९३३८ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.(प्रतिनिधी)
मुलाला वाचविण्यासाठी वडिलांची धडपड
By admin | Published: November 02, 2016 2:37 AM