नागपूर : रेल्वे प्रवाशाच्या हातावर काठीने जोरात फटका मारून त्यांचा मोबाईल खाली पाडून पळ काढणाऱ्या फटका गँगमधील चार आरोपींना लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने गजाआड केले आहे. आरोपींकडून ३ लाख ५६ हजारांचे २७ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
रेल्वेस्थानक येणार असल्यामुळे अनेक प्रवासी आपले सामान घेऊन कोचच्या दारावर मोबाईलवर बोलत उभे असतात. प्रवाशांच्या याच मानसिकतेचा फायदा घेऊन चोरटे त्यांच्या मोबाईलवर डल्ला मारतात. रेल्वेस्थानक येणार असल्यामुळे रेल्वेगाडीचा वेगही कमी झालेला असतो. अशावेळी आऊटरकडील भागात दडून बसलेले आरोपी काठीने संबंधित प्रवाशाच्या हातावर फटका मारून त्याचा मोबाईल खाली पाडतात आणि ते घेऊन क्षणभरात पसार होतात. अशा अनेक तक्रारी येत असल्यामुळे लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास कानपिल्लेवार यांनी या फटका गँगला अटक करण्यासाठी एका पथकाची नेमणूक केली.
दरम्यान, १ एप्रिल २०२३ रोजी दुपारी १.३० वाजता या पथकातील सदस्य पोलिस उपनिरीक्षक प्रवीण भिमटे, विनोद खोब्रागडे, नितीन शेंडे, रोशन अली, अविन गजभे, प्रशांत उजवणे, श्रीकांत उके, बल्लारशाचे पोलिस पंकज बांते, संदेश लोणारे, नीलेश निकोडे यांना बल्लारशाह रेल्वेस्थानकाच्या आऊटरवर चार संशयित आरोपी उभे असल्याची माहिती मिळाली. पथक आरोपींकडे जात असताना शंका आल्यामुळे ते पळून जात होते. अखेर लोहमार्ग पोलिसांनी त्यांना पाठलाग करून ताब्यात घेतले. त्यांच्याजवळून ३ लाख ५६ हजारांचे २७ मोबाईल जप्त करण्यात आले. अटक करण्यात आलेल्या आरोपींना वर्धा लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
नागपूर-हैदराबाद मार्गावर सर्वाधिक चोऱ्या
अटक करण्यात आलेल्या फटका गँगमधील आरोपी नागपूर-हैदराबाद मार्गावरील प्रवाशांचे मोबाईल चोरी करीत होते, अशी माहिती पुढे आली आहे. त्यामुळे लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून आरोपींना मुद्देमालासह अटक केली आहे.
शेख इक्रिमा शेख फिरोज (वय १९, साईबाबा वॉर्ड, बल्लारशाह, जि. चंद्रपूर), करण तुलसीदास जीवने (वय २१, सातनल चौक, आंबेडकर वॉर्ड बल्लारशाह), अमन मखदून शेख (वय २१, राणी लक्ष्मीबाई वॉर्ड बल्लारशाह) आणि पंकज हिरालाल विनक (वय २१, गोरक्षण वॉर्ड, बल्लारशाह), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.