लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कमी दर्जाचे आणि मानकात न बसणारे अन्न पदार्थ उत्पादित करून विक्री केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाचे (अन्न) सहआयुक्त आणि न्यायनिर्णय अधिकारी शशिकांत केकरे यांनी उत्पादक कंपनी आणि प्रतिनिधीला एकूण एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.प्राप्त माहितीनुसार, बुटीबोरी येथील ज्युबिलंट फूड वर्क्स लि. यांच्याकडून अन्न सुरक्षा अधिकारी अमितकुमार उपलप यांनी चीज-मोझारेला या अन्न पदार्थाचा नमुना २० जुलै २०१७ रोजी घेतला होता. हा नमुना अन्न विश्लेषक प्रादेशिक लोक स्वास्थ्य प्रयोगशाळा नागपूर येथे विश्लेषणाकरिता पाठविला होता. चीज-मोझारेला हा अन्न पदार्थ कमी दर्जाचा प्रयोगशाळेने घोषित केला. या प्रकरणी उपलप यांनी अन्न नमुना घेऊन सखोल चौकशी केली. या प्रकरणी भास्कर नंदनवार यांनी विक्रेता पेढीचे प्रतिनिधी नवीन रवींद्रनाथ श्रीवास्तव (मे. ज्युबिलंट फूड वर्क्स लि. बुटीबोरी) आणि उत्पादक पेढीचे प्रतिनिधी संजय केशव मिश्रा व पराग मिल्क फूड्स लि. (ता. आंबेगाव, जि. पुणे) यांच्याविरुद्ध शशिकांत केकरे यांच्यापुढे न्यायनिर्णयाकरिता १९ जुलै २०१८ रोजी खटला दाखल केला होता.न्यायनिर्णय प्रकरणात सुनावणीदरम्यान प्रशासनातर्फे अन्न सुरक्षा अधिकारी आनंद महाजन यांनी बाजू मांडली. गैरअर्जदारांनी कमी दर्जाचे व मानकात न बसणारे अन्न पदार्थ उत्पादित करून विक्री केल्याचे मान्य केले. त्यांच्यावर ठेवण्यात आलेले दोषारोप कबूल केल्यामुळे प्रतिनिधी संजय केशव मिश्रा आणि उत्पादक पेढी पराग मिल्क फूड्स लि. यांना प्रत्येकी ५० हजार रुपयेप्रमाणे एकूण एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
एफडीएने सुनावला एक लाख रुपयांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 9:28 PM
कमी दर्जाचे आणि मानकात न बसणारे अन्न पदार्थ उत्पादित करून विक्री केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाचे (अन्न) सहआयुक्त आणि न्यायनिर्णय अधिकारी शशिकांत केकरे यांनी उत्पादक कंपनी आणि प्रतिनिधीला एकूण एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
ठळक मुद्देसहआयुक्तांचा निवाडा : कमी दर्जाचे चीज-मोझारेला प्रकरण