नागपूर : नागरिकांना शुद्ध अन्नपदार्थ मिळावेत, याची जबाबदारी अन्न व औषध प्रशासन विभागावर आहे. पण विशेषत: सहआयुक्त चंद्रकांत पवार आणि सहायक आयुक्त मिलिंद देशपांडे सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागेवर शासनाने नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती अद्यापही न केल्याने विभागाकडून भेसळीच्या कारवाया थांबल्या आहेत. त्यामुळेच विभागाला दिलेले लक्ष्य पूर्ण करण्यास अधिकारी अकार्यक्षम ठरले आहेत.
जिल्ह्यात केवळ एक सहायक आयुक्त व दहा अधिकारी पुरेसे नसल्याने अन्न पदार्थ असो वा खाद्यतेलातील भेसळ आणि तंबाखूविरोधी कारवाया थंडावल्या आहेत. १ एप्रिलपासून विभागाने भेसळ करणाऱ्यांवर फार कमी कारवाया केल्या आहेत. बाजारात भेसळीचा धंदा फोफावल्याची नागरिकांची ओरड आहे. सहआयुक्त चंद्रकांत पवार यांनी मार्चपूर्वी खाद्यतेलात भेसळ करणाऱ्यांवर कारवाईचा धडाका लावला होता. सध्या नागपूर जिल्ह्यात दहा अन्न सुरक्षा अधिकारी असून त्यातील पाच अधिकारी २५ लाख लोकसंख्येच्या नागपूर शहरात कार्यरत आहेत तर ग्रामीणमध्ये पाच अधिकारी आहेत.
अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे प्रत्येक जिल्ह्याला अन्न पदार्थांचे नमुने एकत्रित करून तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्याचे लक्ष्य दिले जाते. यावर विभाग वर्षभर जास्त गंभीर नसतो. पण वर्षांच्या अखेरच्या दोन महिन्यात बाजारातून अन्न पदार्थांचे सॅम्पल घेऊन प्रशोगशाळेत पाठविण्यासाठी अधिकारी धडपड करतात. माहितीनुसार यावर्षी १ एप्रिल ते २० मेपर्यंत जिल्ह्यातून अन्न पदार्थांचे केवळ १७ सॅम्पल घेतले, तर जिल्ह्याचे टार्गेट ८० सॅम्पलचे आहे. नागपूर विभागांतर्गत या काळात टार्गेट १७६ चे असताना केवळ ५५ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. वर्धा जिल्ह्यात २४ चे टार्गेट असताना केवळ एक सॅम्पल घेण्यात आले. एवढेच नव्हे तर नागपूर जिल्ह्यात धाडीदरम्यान २८.८१ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला तर भंडारा, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली येथून काहीच माल जप्त करण्यात आलेला नाही. यावरून विभागाच्या अधिकाऱ्यांची लोकांच्या आरोग्याविषयी उदासीनता दिसून येते.
अधिकारी म्हणाले, यावर्षी एप्रिल आणि मे महिन्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांना दुसऱ्या विभागात काम देण्यात आले होते. शिवाय काही बाजारपेठा बंद तर काहींवर वेळेचे निर्बंध असल्यामुळे अन्न पदार्थांचे सॅम्पल घेता आले नाहीत. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विभागाला टार्गेट पूर्ण करता आले नाही.
१ एप्रिलपासून सहआयुक्तांचे पद रिक्त
अन्न व औषध प्रशासन नागपूर विभागाचे सहआयुक्त (अन्न) चंद्रकांत पवार ३१ मार्च रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या जागेवर दुसऱ्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. याशिवाय सहायक आयुक्त (अन्न) या पदावरून मिलिंद देशपांडे ३० ऑगस्ट २०१९ ला सेवानिवृत्त झाले. या दोन्ही पदाचा कार्यभार सहायक आयुक्त (ग्रामीण, अन्न) शरद कोलते सांभाळत आहेत. वरिष्ठ अधिकारी नसल्याने त्यांच्यावरही मर्यादा आल्या आहेत.