तिसऱ्या दिवशीही रक्तपेढीचे कामकाज ठप्प : दोन खासगी रक्तपेढ्यांना अभयनागपूर : मेडिकलच्या रक्तपेढीतील त्रुटींवर बोट ठेवत कामकाज बंद ठेवण्याचा आदेश तिसऱ्या दिवशी शुक्रवारीही अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मागे घेतला नाही. एकीकडे मेडिकल त्रुटी दूर करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करीत असताना एफडीए मात्र मेडिकलला वेठीस धरण्याचा क्रूर प्रकार करीत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. सध्या मेडिकलकडे रक्तपिशव्यांचा मोजकाचा साठा असून तो केवळ गंभीर रुग्णांसाठीच उपयोगात आणला जात आहे. एफडीएने २३ जून रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) रक्तपेढीची तपासणी करीत रक्तपेढीची अयोग्य रचना, आरोग्यवर्धक नसलेले रक्त गोळा करण्याचे ठिकाण, अयोग्य पद्धतीने होत असलेले रक्तपिशव्यांवरील ‘लेबलिंग’ व ‘एलायझा रिडर’मशीनमधील दोष, सेल्स कॉऊंट मशीन, कोअॅग्युलो मीटर आणि पी.एच. मीटर मशीन नसल्याच्या प्रमुख त्रुटी काढत कारणे दाखवा नोटीस बजावली होती. मेडिकल प्रशासनाने त्यांच्या पातळीवर जे शक्य आहे, त्या सर्व त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न केला. यात एफडीएने सांगितल्याप्रमाणे ‘लेबलिंग’ची पद्धत बदलविली. रक्त गोळा करण्याचे ठिकाणाच्या स्वच्छतेकडे लक्ष दिले. रक्तपेढीतील रचनेत बदल आणि लाखो रुपये किमतीच्या मशीन खरेदी करण्याचा प्रस्ताव संबंधित विभागाला पाठविले. विशेष म्हणजे सप्टेंबर महिन्यात एफडीएच्या निरीक्षकाने पाहणी केली त्यावेळी त्यांनी झालेल्या बदलीवर समाधान व्यक्त केले. असे असतानाही लाखो रुपये किमतीची मशीन खरेदीवर अवलंबून असलेली ‘क्वालिटी कंट्रोल प्रयोगशाळा’ नसल्याचे कारणे देत बुधवारी अचानक रक्तपेढीचे कामकाज बंद ठेवण्याचे आदेश औषध प्रशासनाचे सहआयुक्त मोहन केकतपुरे यांनी दिले.
एफडीएने धरले मेडिकलला वेठीस
By admin | Published: October 31, 2015 3:15 AM