कारवाईसाठी स्टेट फार्मसी कौन्सिलला पाठविले पत्र : मेडिकलने विभाग प्रमुखांना मागितला खुलासा नागपूर : मेडिकलच्या त्वचा व गुप्त रोग विभागात दोन फार्मासिस्ट असताना एक चतुर्थ कर्मचारी रुग्णांना औषधांचे वितरण करीत असल्याचे व तब्बल अडीच वर्षांपासून रुग्णांच्या जीवाशी खेळत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने ‘स्टिंग आॅपरेशन’ करून उजेडात आणताच खळबळ उडाली. अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) चमूने संबंधित विभागाला भेट देत चौकशी सुरू केली, तर मेडिकल प्रशासनाने विभाग प्रमुखाला या प्रकरणाचा खुलासा मागितला आहे. डॉक्टर हा उपचारांमधील तज्ज्ञ असतो, तर फार्मासिस्टला औषधांचे ज्ञान असते. कायद्यानुसार फार्मासिस्टने औषधांचे प्रिस्क्रि प्शन नीट वाचून रु ग्णांना औषधे देणे आवश्यक असते. मात्र, आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रुग्णालय म्हणून ओळख असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) त्वचा व गुप्त रोग विभागात मुश्ताक पठाण नावाचा चतुर्थ कर्मचारी रुग्णांना औषध वितरित करायचा. विशेष म्हणजे, या विभागासाठी मनोज मानकर व विनोद सोनपिपरे नावाचे दोन फार्मासिस्ट आहेत. परंतु ते आपली जबाबदारी पठाण यांच्यावर टाकून दिवसभर खासगी काम करायचे. ‘लोकमत’ने १० मार्चच्या अंकात ‘सफाई कर्मचारी झाला ‘फार्मासिस्ट’ हे वृत्त प्रसिद्ध करताच अनेकांनी आश्चर्य व्यक्त करीत, विभाग प्रमुखांच्या कार्यपद्धतीवरच संशय व्यक्त केला. गरीब रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही अनेकांनी केली. या वृत्ताला गंभीरतेने घेत अन्न व औषध प्रशासनाच्या चमूने सकाळीच त्वचा व गुप्त रोग विभाग गाठले. चौकशी सुरू करताच अनेकांचे धाबे दणाणले. विशेष म्हणजे, कधी नव्हे ते दोन्ही फार्मासिस्ट आज औषध वितरित करीत होते. त्यांचे बयाण नोंदवून घेण्यात आले. ‘लोकमत’च्या ‘व्हीडीओ’मध्ये चतुर्थ कर्मचारी औषध वितरित करताना दिसत असल्याने मनोज मानकर व विनोद सोनपिपरे यांच्यावर पुढील कारवाई करण्यासाठी ‘स्टेट फार्मसी कौन्सिल महाराष्ट्र’ला तसे पत्र पाठविण्यात आले, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त मोहन केकतपुरे यांनी ‘लोकमत’ला दिली. तर मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी या घटनेला धक्कादायक प्रकार संबोधत त्वचा व गुप्त रोग विभागाचे प्रमुख डॉ. आर.पी. सिंग यांना खुलासा मागितला आहे. हा खुलासा आल्यानंतरच पुढील कारवाईसाठी वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाला पाठविण्यात येईल, असेही ते म्हणाले.(प्रतिनिधी)
‘एफडीए’ने केली चौकशी
By admin | Published: March 11, 2017 2:33 AM