लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: उघड्यावर, अस्वच्छ ठिकाणी मिठाई बणवून ती ग्राहकांना विकणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासनाने नजर रोखली आहे. नागरिकांच्या आरोग्याला अपायकारक असणाऱ्या या मिठाई बनविणाऱ्यांविरुद्ध एफडीएने एक मोहिमच सुरु केली असून त्या अंतर्गत अनेक ठिकाणचे नमूनेही ताब्यात घेण्यात आले आहे.
दिवाळीला शहरातच नव्हे तर गावोगावीही मोठ्या प्रमाणात विविध प्रकारच्या मिठाईची खरेदी विक्री होते. कोट्यवधींची उलाढाल करणारे मिठाईवाले दिवाळीच्या दोन आठवड्यांपूर्वीपासूनच वेगवेगळ्या गोदामात, लॉनसारख्या मोकळ्या जागेत तात्पुरते छत टाकून मिठाई तयार करतात. अनेक ठिकाणी मिठाई बनविण्यासाठी वापरले जाणारे पाणी, तेथील वातावरण चांगले नसते. बाजुलाच घाण, कचरा, चिखल असतो. तशा ठिकाणी बरेच दिवस ती मिठाई (पेठा, बरफी, काजू कतली, लाडू वगैरे) पडून असते. माशा, डांसांचाही त्या ठिकाणी सुळसुळाट असतो. तीच मिठाई नंतर आकर्षक वेष्टनात पॅक करून ती विविध ठिकाणाहून ग्राहकांना विकली जाते.
बरेचदा अशा मिठाईला बुरशी चढते किंवा ती खाण्यास योग्य नसते. अनेक ठिकाणी अशा मिठाईमुळे फुड पॉईजनसारखे प्रकारही घडतात. ते लक्षात घेता उघड्यावर, गलिच्छ ठिकाणी मिठाई बनविण्यास मनाई आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून लपून छपून काही जण मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या प्रकारची मिठाई बनवितात. अशा निर्मित्यांवर एफडीएने नजर रोखली आहे. या पार्श्वभूमीवर, काही फरसाणमधील मिठाईंचे सॅम्पलही घेण्यात आले आहे.
लाखोंच्या महसुलाला फटका- अवैधपणे अशी मिठाई तयार करणारी मंडळी त्यातून कोट्यवधींची उलाढाल करते. मात्र, आळीमिळी गुपचिळीने हा गोरखधंदा केला जात असल्याने कसल्याची प्रकारचा कर भरला जात नाही. अर्थात, त्यातून सरकारचा लाखोंचा महसुलही बुडविला जातो.
तपासणी अहवाल आल्यानंतर कारवाई- विशेष मोहिमेतून नेमके किती ठिकाणी सॅम्पल गोळा करण्यात आले, त्याबाबत आता माहिती देता येणार नसल्याचे एफडीएचे सहायक आयुक्त ए. पी. देशपांडे यांनी सांगितले. मात्र, गोळा करण्यात आलेले सॅम्पल तपासणीसाठी तज्ज्ञांकडे पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतर संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती देशपांडे यांनी दिली.