नागपूर : म्युकरमायकोसिसच्या रुग्णांत वाढ होताच औषधी मिळेनाशा झाल्या आहेत. ‘लिपोसोमल एम्फोटीसिरीन-बी’, ‘पॉसॅकोनाझोल’ व ‘आयसावॅकॅनाझोल’ आदी इंजेक्शनचा नागपूर जिल्ह्यातच नव्हेतर, राज्यात तुटवडा झाला आहे. याची साठेबाजी व गैरव्यवहार होऊ नयेत यासाठी शहरातील कंपनीचे डेपो, बाजारपेठेतील घाऊक व किरकोळ विक्रेत्यांना जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे नोटीस देण्यात आली असून, त्याद्वारे दररोज औषधी खरेदी व विक्रीचा तपशील अन्न व औषध प्रशासनाकडे (एफडीए) देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
‘एफडीए’ने काढलेल्या पत्रकानुसार, १५ दिवसांपूर्वी म्युकरमायकोसिस आजारावरील या औषधांची मागणी नव्हती. यामुळे त्याची निर्मिती उत्पादकातर्फे अतिशय कमी प्रमाणात होत होती. अचानक रुग्ण वाढल्याने संपूर्ण राज्यात मागणी वाढू लागली. सध्या नागपुरात या औषधांचा साठा निरंक आहे. औषधांच्या उत्पादकांपैकी केवळ भारत सीरम ही कंपनीच महाराष्ट्रात अंबरनाथ येथे निर्मिती करते. इतर उत्पादक हे राज्याबाहेरील आहेत. औषधांचा काळाबाजाार होऊ नये म्हणून त्याच्या खरेदी व विक्रीवर ‘एफडीए’ नजर ठेवणार आहे. सोबतच साठेबाजी व गैरव्यवहार करणाऱ्यांच्या विरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिले आहेत. औषधांच्या तुटवड्याची माहिती रुग्णालयांनी व औषध विक्रेत्यांनी रुग्णांच्या नातेवाइकांना देण्याचे व त्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.