ठळक मुद्देअनेकांकडे परवानेच नाही घाणीत तयार होणारे भोजन पाहून अधिकारीही चक्रावले तीन तास चालली कारवाईलोकमत इम्पॅक्ट
लोकमत न्यूज नेटवर्क सुमेध वाघमारे/ दयानंद पाईकरावनागपूर : उघड्यावर आणि घाणीत तयार होणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या खाद्यपदार्थांचे धक्कादायक वास्तव ‘लोकमत’ने मंगळवारी उघडकीस आणताच खळबळ उडाली. अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) चार पथकाने मिळून मध्यवर्ती रेल्वेस्थानकासमोरील २१ हॉटेल्सवर धाडी टाकून तपासणी केली. अस्वच्छ, मळकट व माशा घोंगवणाऱ्या हॉटेल्समध्ये उघड्यावरच पोळ्या लाटण्यापासून ते भाजीला फोडणी देण्याची कामे पाहून पथकातील अन्न सुरक्षा अधिकारीही चक्रावले. अनेकांकडे हॉटेल्स चालविण्याचा परवानाही नव्हता. काहींचे किचन पाहून तर अधिकाऱ्यांना उलट्या येण्याची वेळ आली. बुधवारी या सर्व हॉटेल्सचालकांना नोटीस बजावली जाईल, अशी माहिती अन्न प्रशासनाचे सह आयुक्त शशिकांत केकरे यांनी दिली.शहराचे महत्त्वाचे ठिकाण असलेल्या रेल्वेस्थानकासमोरील काही हॉटेल्सचालकांनी प्रवाशांच्या व नागरिकांच्या आरोग्याशी खेळ चालविला आहे. कुठल्याही सोयी नसताना पुलाच्या खाली ४० वर हॉटेल्स धडाक्यात सुरू आहे. यातील दोन-चार हॉटेल्स सोडल्यास इतर सर्व हॉटेल्समध्ये अस्वच्छता, घाण, उघड्यावर खाद्यपदार्थ, उघडे किचन असेच दृश्य ‘लोकमत’ चमूला दिसले. बहुसंख्य हॉटेल्स चालकांनी तर भोजन तयार करण्यासाठी रस्त्यावरच भट्टी लावली आहे. त्यामुळे रस्त्यावरील धूळ थेट अन्नपदार्थात पडून ग्राहकांच्या थाळीत येते. काही हॉटेल्सचालक तर भोजन तयार करण्यासाठी फूटपाथही सोडत नाही. भातापासून ते भाज्या चिरण्यापर्यंत सर्व कामे फूटपाथवर होतात. अस्वच्छ हॉटेलमध्ये स्वयंपाक करणारी व भोजन वाढणारी मंडळीही नीटनेटकी नाही. ज्या ताट-वाट्यांमध्ये ग्राहकांना जेवण दिले जाते त्या घाण पाण्यातून धुतल्या जातात. विशेष म्हणजे, येथे पाण्याची सोय नाही. एका खासगी टँकरच्या मदतीने हॉटेल्सवाले पाण्याचे ड्रम भरुन ठेवतात. त्यातून अन्नपदार्थ तयार केले जाते तेच पाणी ग्राहकांना पिण्यास दिले जाते, याचे सविस्तर वृत्त ‘लोकमत’ने ‘येथे मिळतो विकतचा आजार’ या मथळ्याखाली प्रसिद्ध केले. या वृत्तामुळे हॉटेल्स चालकांचे धाबे दणाणले. पाच-सहा हॉटेल्स चालकांनी तर आपले हॉटेल्स उघडलेच नाही. काहींनी दुपार नंंतर बंद केले तर काहींनी ‘एफडीए’ची धाड पडत असल्याचे पाहत ग्राहकांना आत घेऊन बाहेरून शटर बंद केले.