सुमेध वाघमारे
नागपूर : इंडियन कौंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) व नॅशनल सेंटर फॉर डिसीज इर्न्फामेटिकस् अँड रिसर्च, (एनसीडीआयआर) बंगलोरने सादर केलेल्या अहवालात पुढील ५ वर्षांत म्हणजे २०२५ मध्ये महाराष्ट्रातील महिलांमध्ये कर्करोगाचे प्रमाण ११.१ टक्क्याने, तर पुरुषांमध्ये १०.९ टक्क्याने वाढण्याची शक्यता वर्तवली आहे.
अहवालानुसार राज्यात २०२० मध्ये राज्यात १,१६,१२१ नव्या कॅन्सर रुग्णांची नोंद झाली होती. २०२५ मध्ये ११ टक्क्याने यात वाढ होऊन १,३०,४६५ रुग्ण होण्याची शक्यता आहे. २०२० मध्ये ६१,१६० महिलांना कर्करोग झाला होता. २०२५ मध्ये यात ११.१ टक्क्याने वाढ होऊन, ६८,७६२वर जाण्याची शक्यता आहे. २०२० मध्ये ५४,९६१ पुरुषांना कर्करोगाचे निदान झाले होते, २०२५ मध्ये १०.९ टक्क्याने यात वाढ होऊन रुग्णांची संख्या ६१,७०३ होण्याची भीती आहे.
-राज्यात मुंबईनंतर नागपुरात कॅन्सरचे सर्वाधिक रुग्ण
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटलचे संचालक डॉ. कर्तार सिंह व मानद सल्लागार डॉ. बी. के. शर्मा यांनी सांगितले की, हॉस्पिटलच्या अभ्यासानुसार, राज्यात मुंबईनंतर नागपुरात सर्वाधिक कॅन्सरचे रुग्ण दिसून येतात. मुंबईत दरवर्षी एक लाख पुरुषांमध्ये १०८, तर एक लाख महिलांमध्ये ११७ महिलांना कोणत्या ना कोणत्या कर्करोगाची लागण होते, तर नागपुरात एक लाख लोकसंख्येमागे ९१ पुरुष आणि ९० महिला आहेत.
-लहान मुलांच्या कर्करोगात नागपूर पुढे
डॉ. शर्मा म्हणाले, लहान मुलांच्या कर्करोगात राज्यातील इतर शहरांच्या तुलनेत नागपूर पुढे आहे. ० ते १९ या वयोगटात कर्करोगाचे प्रमाण ८५.४ टक्के आहे. विशेष म्हणजे, नागपुरातील १० पैकी एक पुरुष, तर ११ महिलांपैकी एका महिलेला कर्करोगाचा धोका आहे.
-राज्यातील कर्करोगाची स्थिती
:: पुरुषांमध्ये मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण ११.१ टक्के
:: फुप्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण ८.४ टक्के
:: प्रोस्टेट कर्करोगाचे प्रमाण ७.० टक्के
:: स्त्रियांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण २९.९ टक्के
: गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण ११.० टक्के
:: ओव्हरी कर्करोगाचे प्रमाण ६.३ टक्के
:: तंबाखूच्या संबंधित कर्करोगाचे प्रमाण पुरुषांमध्ये ४०.६ टक्के, तर महिलांमध्ये १५.६ टक्के आहे.
:: फुप्फुसाच्या कर्करोगाचे ५४ टक्के, तर पोटाच्या कर्करोगाचे २९ टक्के रुग्ण गंभीर अवस्थेतच उपचारासाठी येतात.