लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: कोरोनाशी दोन हात करण्यासाठी अवघे जग सज्ज झालेअसताना त्याचा वाढता वेग पाहता कुठे चुकतंय हे तपासण्यासाठी बरीच मोठी यंत्रणा कामी लागली आहे. सोशल डिस्टन्सिंगचे नियम आले, मास्क लावतोय, होम क्वारंटाईन सुरू आहेच. या सगळ्यासोबत अजून काही महत्त्वाच्या गोष्टी करणे आवश्यक आहे. तीत सर्वात पहिली बाब ही की, कोरोनाने आपण ग्रस्त होऊ व मरण येईल ही भीती सर्वात जास्त नुकसान करते आहे. निसर्गायण मंडळ हा नागपुरात पर्यावरणप्रेमींनी गेल्या दहा वर्षांपासून चालवलेला एक उपक्रम आहे. यातील एक सदस्य रविकिरण महाजन यांनी कोरोनाबाबत एक वेगळा विचार मांडला आहे.ते म्हणतात, या विषाणूवर अद्याप कोणतेच औषध शोधले गेलेले नाही. ती एका महामारीच्या रुपाने आपल्यासमोर उभे आहे. अशात आपल्याजवळ असलेली रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे हा पहिला उपाय आहे. आणि या उपायातला महत्त्वाचा मुद्दा असा की, जर आपण कायम भयभीत अवस्थेत राहू तर आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढणार नाही. याचे कारण जेव्हा मानवाचे शरीर व मन भयग्रस्त होते तेव्हा ते कार्टिसोल, इन्ट्रल्युकिन व सायटोकिनसारखे घातक द्रव्य तयार करते. ही द्रव्ये तयार होण्यामागचे कारण असे की, ही द्रव्ये शरिराला संदेश देतील की, कुठलेतरी संकट येत आहे, तयार रहा. त्यामुळे एरव्ही विकास व दुरुस्तीमध्ये व्यस्त असलेलं आपलं शरीर या आपत्तीकाळासाठी सज्ज होतं. मात्र मनात अत्याधिक भय असेल तर ते आपले काम ठीक करू शकत नाही. म्हणजे आपल्याकडे लढण्याची सामग्री तर आहे पण ती सामग्री आपणच आपल्या कुलुपात बंद केल्यासारखी होते आहे. आपण आजारी पडू या भयानेच आपण अर्धमेले होत जातो. आपली ही भीतीच आपली खरी शत्रू आहे. ती दुसऱ्या शत्रूसोबत लढण्याची शरीराची क्षमता खेचून घेते. शरीर भयग्रस्त असेल तर ते रोगप्रतिकारक शक्ती योग्यरितीने वापरू शकणार नाही. त्यामुळे करोनाची भीती मनातून काढून टाकणे हा पहिला मोठा उपाय आहे.त्याचसोबत आपला आहार विहार हा योग्य असावा. कडुलिंब, तुळस, हळद, ओवा, सुंठ, अश्वगंधा, शतावरी, निलगिरी, गुळवेल, लसूण, दालचिनी, कोरफड अशा व अन्य काही गोष्टी आहेत ज्या आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवीत असतात. त्यांचे नित्य सेवन व्हायला हवे. निसर्ग हा आपल्या चक्रानुसार चालत असतो. मानवाने त्याच्या चक्रात निर्माण केलेले अडथळे प्रयत्नपूर्वक कमी करायला हवेत. आपण व निसर्गामध्ये आपण भिंत उभी केली आहे. ही भिंत संपायला हवी.