लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशात कोरोना विषाणूचे पाच रुग्ण आढळले असले तरी महाराष्ट्रात एकाही रुग्णाची नोंद झाली नाही. परंतु संशयित रुग्णांची संख्या वाढली आहे. नागपुरात तीन संशयित रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे खबरदारी म्हणून लोकांकडून व प्रवाशांकडून ‘एन-९५’ मास्कची मागणी वाढली आहे. पूर्वी नागपुरात जिथे दिवसभरात २०० ते ५०० मास्कची विक्री व्हायची ती संख्या आता तीन हजाराच्या घरात गेली आहे. ही मागणी अशीच राहिल्यास तुटवडा पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.उपराजधानीत कोरोना विषाणूला घेऊन सतर्कता पाळली जात आहे. मेडिकलमध्ये वॉर्ड क्र. २५ सज्ज करून ठेवण्यात आला आहे. येथे व्हेंटिलेटरसह औषधोपचाराची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागपुरात जे तीन संशयीत रुग्ण आढळून आले होते त्यांना याच वॉर्डात उपचारासाठी ठेवण्यात आले होते. नंतर त्यांचे नमुने निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले.
-एन-९५ मास्कचा वाढला वापरअखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेचे सदस्य हरीश गणेशानी म्हणाले, नागपुरात ‘एन-९५’ मास्कची विक्री दिवसभरात साधारण ५००च्या आत होती. परंतु कोरोना विषाणूच्या दहशतीमुळे या मास्कचा वापर वाढला आहे. एका मास्कची किंमत १५० रुपये आहे. सध्या रोज तीन हजारावर मास्क विकल्या जात असल्याची माहिती आहे. या मास्कची सर्वाधिक मागणी प्रवाशांकडून होत आहे. ही मागणी वाढल्यास तुटवडा पडण्याची शक्यता आहे. सध्या देशात या मास्कचा तुटवडा निर्माण झाला असून केंद्र सरकारने मास्कच्या निर्यातीवर बंदी घातली आहे.